Sarfaraz Khan ला उपांत्यपूर्व सामन्यापूर्वीच करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दाखल, संघाला मोठा धक्का; नेमकं काय घडलं?
esakal February 06, 2026 04:45 AM

Sarfaraz Khan Hospitalized with Viral Fever: दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सर्फराज खानला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजत आहे. सर्फराज सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेसाठी मुंबई संघाचा भाग आहे. मुंबईने या स्पर्धेत उपांत्यपूर्वी फेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्य फेरीचे सामने शुक्रवारपासून (६ फेब्रुवारी) सुरू होणार आहेत. मुंबईला तुल्यबळ असलेल्या कर्नाटक संघाशी दोन हात करायचे असून हा सामना बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट ऍकेडमीमध्ये होणार आहे.

मात्र, सर्फराज खान (Sarfaraz Khan) त्यापूर्वीच आजारी पडला आहे. त्याला ताप भरला आहे. त्यामुळे तो उपांत्यपूर्व फेरीत मुंबईसाठी (Mumbai) खेळणार की नाही यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

Ranji Trophy: अंतिम ८ संघ ठरले; महाराष्ट्र, विदर्भ स्पर्धेतून बाहेर, तर मुंबईची उपांत्यपूर्व फेरीत धडक; पाहा संपूर्ण वेळापत्रक

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सुत्रांनी माहिती दिली की सर्फराजला व्हायरल ताप आला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला बरं नाहीये, त्यामुळेच तो दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईसाठी दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता. सध्याच्या घडीला सर्फराज कर्नाटकविरुद्धच्या सामन्यापर्यंत बरा होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.'

तथापि, बुधवारी जेव्हा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जेव्हा मुंबई संघाशी संवाद साधला होता, तेव्हा सर्फराज मुंबई संघासोबत होता. सर्फराज मुंबईकडून दिल्लीविरुद्ध झालेला अखेरचा साखळी सामना खेळला होता. त्यावेळीही तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करत असल्याचे दिसले होते. त्या सामन्यात त्याने २७ चेंडूत २४ धावा केल्या होत्या.

सर्फराज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे तर तो खेळण्यासाठी उपलब्ध नसेल, तर मुंबईसाठी हा मोठा धक्का असेल. त्याने गेल्या काही महिन्यात मुंबईसाठी अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. नुकतेच हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात (Ranji Trophy) त्याने २१९ चेंडूत २२७ धावांची खेळी केली होती. त्याने या रणजी स्पर्धेत ७ सामन्यात ४२९ धावा केल्या आहेत.

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार यशस्वी जैस्वाल मुंबई संघात

उपांत्यपूर्व सामन्यासाठी मुंबई संघात यशस्वी जैस्वालचा समावेश करण्यात आल आहे, त्यामुळे संघाला दिलासाही मिळाला आहे. तो कर्नाटककडून खेळताना दिसू शकतो. त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

मुंबई संघ ४३ व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने यंदाच्या हंगामात खेळत आहेत. मुंबईने साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. मुंबईने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत, तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.