चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात अवैध रिक्षांचा सुळसुळाट; प्रवासी त्रस्त
चेंबूर, ता. ४ (बातमीदार) : चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात अवैध रिक्षा उभ्या राहत असल्याने रेल्वे प्रवाशांना स्थानकात ये-जा करताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्थानकाच्या प्रवेश व निर्गमन मार्गांवर रिक्षाचालक मनमानी पद्धतीने रिक्षा उभ्या करीत असल्यामुळे प्रवाशांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या चेंबूर रेल्वे स्थानकात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. वाढती प्रवासीसंख्या लक्षात न घेता स्थानकाबाहेर रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने गर्दी अधिकच वाढत आहे.
या परिसरात स्वामी विवेकानंद महाविद्यालय, आचार्य मराठे महाविद्यालय, शहा अँड अँकर महाविद्यालय, जनरल एज्युकेशन स्कूल, एएफएसी स्कूल, ओएलपीएस, सेंट अँथनी, मुक्तानंद, शुक्ला शाळा तसेच विविध शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी व स्थानिक नागरिकांची या भागात मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते.
पुनर्वसन व पुनर्विकास प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, स्थानक परिसरात कायमच गर्दी पाहायला मिळते. स्थानकाबाहेर पिझ्झा-बर्गरची दुकाने असून, फुटपाथवर अनधिकृत फेरीवाल्यांप्रमाणे रिक्षाचालक अवैध रिक्षा उभ्या करीत आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या अवैध रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रेल्वे प्रवासी सुरक्षा सेवा संघटनेने दिला आहे.