दर्शन, पार्किंग, हॉटेल… सगळ्याच्या नावाखाली शिर्डीमध्ये फसवणूक, दलालांवर अखेर प्रशासनाचा मोठा दणका
Saam TV February 06, 2026 04:45 AM

सचिन बनसोडे, साम टीव्ही

देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची अडवणूक करून दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अशा दलाल आणि दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 152 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार, दिग्गज नेत्याची घोषणा

साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येत असतात. मात्र काही दलालांकडून भाविकांची सार्वजनिक रस्त्यांवर, चौकात तसेच मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर अडवणूक करून त्यांची दिशाभूल केली जात होती. खासगी पार्किंगमध्येवाहन लावण्यास भाग पाडणे, स्वतः अधिकृत प्रतिनिधी असल्याचा बनाव करणे तसेच भाविकांना चुकीची माहिती देऊन आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय काही दलालांकडून भाविकांना ठराविक हॉटेल, लॉज, धर्मशाळा तसेच दुकानांकडे जबरदस्तीने वळवले जात होते.

महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर, कोण कोणत्या नेत्यांचा समावेश, पाहा यादी

पूजा साहित्य ठराविक दुकानांतूनच खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असून जादा दराने साहित्य विक्री करून भाविकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी कलम 152 अन्वये सशर्त प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नव्या आदेशानुसार कोणालाही साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणेचा प्रतिनिधी असल्याचा आभास निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

१२ जिल्ह्यात शनिवारी शाळांना सुट्टी, सरकारी ऑफिसही राहणार बंद; दारूच्या दुकानांना असेल कुलूप, कारण काय?

दर्शन, निवास, भोजन किंवा इतर सेवांच्या नावाखाली मध्यस्थी करणाऱ्या दलालांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी दिलीये..प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांची फसवणूक थांबेल, दर्शन व्यवस्था अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनेल तसेच कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे..

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.