प्रतीक्षानगर संक्रमण शिबिरातील धोकादायक चार इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी
भाडेकरू-रहिवाशांची त्याच आराखड्यात स्थलांतराची मागणी मान्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : सायन प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरातील वास्तव्यास धोकादायक ठरलेल्या चार इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. येथील भाडेकरू-रहिवाशांची त्याच अभिन्यासात (लेआऊट) पात्रतेच्या धोरणानुसार स्थलांतर करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे. त्यानुसार या अभिन्यासात प्रस्तावित विक्री घटकासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी बांधण्यात येणाऱ्या काही इमारतींचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव रद्द करून त्या ठिकाणी संक्रमण सदनिकांची इमारत बांधण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्यामुळे संबंधित रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
म्हाडाने रहिवाशांच्या मागणीच्या अनुषंगाने घेतलेल्या या निर्णयामुळे चार संक्रमण इमारतींतील २६१ भाडेकरू/रहिवासी व चार दुकानदारांसाठी तळ अधिक २२ मजली अशी एकूण ३२२ संक्रमण सदनिकांचा समावेश असलेल्या दोन इमारती बांधण्यात येणार असून या इमारतींमध्ये त्यांचे स्थलांतर पात्रतेच्या धोरणानुसार केले जाणार आहे. संक्रमण शिबिरातील या चार इमारतींतील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या संक्रमण इमारतींचे बांधकाम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षे कालावधी लागण्याची शक्यता आहे.
सायन प्रतीक्षानगर येथील संक्रमण इमारत क्र. ३६, ३७, ५३ व ५४ खालून भूमिगत जलवाहिनी गेली असल्यामुळे या इमारतींना तडे जाण्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मुंबई मंडळाने आयआयटी मुंबई यांच्यामार्फत संबंधित इमारतींचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातील अहवालामध्ये या चारही संक्रमण इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत नमूद करण्यात आले. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर व भाडेकरू/रहिवाशांची त्याच अभिन्यासात स्थलांतर करण्याच्या मागणीचा विचार करून या संक्रमण इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुनर्विकसित इमारतींचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत संक्रमण इमारत क्र. ३६, ३७, ५३ व ५४ मधील भाडेकरू/रहिवाशांना त्यांची तात्पुरती पर्याय व्यवस्था करण्यास्तव म्हाडाच्या धोरणानुसार भाडे देऊन स्थलांतर करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मान्यता दिली आहे.