सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : नवी मुंबई महापालिकेवर लोकप्रतिनिधींची सत्ता अखेर स्थापन झाली आहे. महापालिकेवर गेली सहा वर्षे प्रशासक राजवट होती. या काळात केलेल्या विकासकामांचे लेखापरीक्षण (ऑडिट) केल्यास गैर काय, असा टोला नवनिर्वाचित उपमहापौर दशरथ भगत यांनी लगावला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी याआधीच सभागृहातील कामांची पडताळणी करणार असल्याचा पुनरुच्चार भगत यांनी केला. भगत यांच्या वक्तव्यामुळे पहिल्याच दिवशी शिंदे गटातील नेत्यांमध्ये चर्चेला तोंड फुटले आहे.
नवी मुंबई महापालिकेतील कामांवरून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांवर वारंवार टीका केली आहे. यामुळे दोन्ही पक्षांतील नाते ताणले गेले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत महायुतीखाली निवडणूक होऊ शकली नाही. महापालिकेत शिंदे यांच्या आदेशामुळे होत असलेल्या कामांवर अनेकदा नाईक यांनी प्रश्न उपस्थित करित पाणीचोरी होत असल्याचा आरोप केला आहे. पाण्यासारख्या नवी मुंबई महापालिकेच्या अनेक सुविधांमध्ये वाटमारी केली जात असल्याचे वक्तव्य नाईक यांनी केले आहे. त्याच वक्तव्यांचा धागा धरून दशरथ भगत यांनी प्रशासक राजवटीत केलेल्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे संकेत दिले.
जनतेची मागणी!
भगत यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांसोबत चर्चा करताना, सभागृहात यापूर्वी झालेल्या कामांची पडताळणी केल्यास गैर काय, असा प्रश्न उपस्थित केला. गणेश नाईक यांनी याआधीदेखील कामांची पडताळणी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जेव्हा सभागृहात येऊन कामांची तपासणी करतात, तेव्हा ही जनतेची मागणी आहे. त्यानुसार काम केले जात असेल, तर काही हरकत नाही, असे भगत यांनी स्पष्ट केले.
नव्या वादाला तोंड फुटले
शेवटी सर्वांना सोबत घेऊन जात महापालिकेचे कामकाज करणार असल्याचे सांगायला भगत विसरले नाहीत, मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या गोटात वादाला तोंड फुटले आहे.१