राजीव गांधी पुलाखालील श्री गणेश चौकाच्या सुशोभीकरणाची मागणी
नेरूळमधील चौथऱ्याची दुरवस्था; आयुक्तांकडे निवेदन
नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर आठ व दोन यांना जोडणाऱ्या राजीव गांधी पुलाखाली असलेल्या श्री गणेश चौकाच्या सुशोभीकरणाची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज चव्हाण यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. श्री गणेश चौकातील चौथरा उंदरांनी बीळ पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून, परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना तसेच भाविकांना दर्शनासाठी येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिसरातील स्वच्छतेचा अभाव व मोडकळीस आलेला चौथरा याचा परिसराच्या सौंदर्यावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे चौथऱ्याची तातडीने दुरुस्ती करून संपूर्ण परिसराची नियमित स्वच्छता करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
प्रेरणादायी सुशोभीकरणाची मागणी
राजीव गांधी पुलाखालील मोकळ्या जागेत, दादरच्या शिवाजी पार्कच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे फायबरचे तैलचित्र बसवून परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे परिसराला ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप मिळून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास मनोज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.