ओतूर, ता. ५ ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थिकलश बुधवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता ओतूर (ता. जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी आयोजित शोकसभेला ओतूर व परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते अजित पवार यांचा अस्थिकलश आणण्यात आला. यावेळी नागरिकांनी अजितदादा अमर रहेच्या घोषणा दिल्या.
यावेळी माजी आमदार अतुल बेनके हे ऋणनिर्देश करताना म्हणाले, ‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कायम स्मरणात राहावे म्हणून जुन्नर तालुक्यात ६ हजार ६६६ आंब्याच्या रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असून, या झाडामध्ये दादांच्या स्मृती आपल्यात राहणार आहेत.’’
विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले, ‘‘अजितदादा पवार गेल्यामुळे आम्हाला असुरक्षित वाटू लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दादांनी मला भेटायला बोलावलं होते आणि गडबड करू नको जाग्यावर थांबा, शांतरहा असा सल्ला दिला होता. मात्र, दादांच्या अपघाती जाण्याने असुरक्षित वाटू लागले असून, जिल्ह्याचे व तालुक्याचे पालकत्व हरवले आहे. दादा सहाकारासह व सर्वच क्षेत्राची जाण असलेले नेते होते.’’
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते सचिन आहेर, ‘विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, तुषार थोरात, बबन तांबे, शरद लेंडे, गुलाब पारखे, शारदा शिंदे, जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे, तुळशीराम भोईर, बाजीराव ढोले, अनंतराव चौगुले, विशाल तांबे, विकास दरेकर, सुजित खैरे आदींसह पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.
01445