'धुरंधर' ओटीटीवर येताच रणवीरबद्दल या अफवांना उधाण; सेटवर त्याला मिळाली अशी वागणूक?
Tv9 Marathi February 06, 2026 01:45 AM

गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर धुरंधर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटातील प्रत्येक लहान-मोठ्या बाबींकडे बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. संवाद, पार्श्वसंगीत, दृश्यरचना ते अगदी एंड क्रेडिट्सपर्यंत सर्व काही चर्चेत आलं. त्याचदरम्यान कलाकारांच्या सुविधांबाबत, विशेषतः अभिनेता रणवीर सिंहच्या व्हॅनिटी व्हॅनविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली. मागील वर्षी रणवीर चित्रपटांसाठी तीन व्हॅनिटी व्हॅन वापरतो, अशा बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या दाव्याला कधीही अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. धुरंधरच्या एंड क्रेडिट्सनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा ही बाब चर्चेत आली.

यादरम्यान हिंदुस्तान टाइम्सने केलेल्या पडताळणीत स्पष्ट झालं आहे की हा दावा केवळ सोशल मीडियावरील अंदाजांवर आधारित होता. रेडिटवर एका युजरने चित्रपटाच्या एंड क्रेडिट्सचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. त्यामध्ये रणवीर सिंहच्या ‘हमजा’ या पात्राच्या नावाखाली हमजा व्हॅन, हमजा स्टाफ व्हॅन आणि हमजा नॉर्मल व्हॅन असा उल्लेख दिसत होता. याच आधारावर रणवीरसाठी तीन व्हॅनिटी व्हॅन वापरल्या गेल्याचा समज पसरला. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना प्रॉडक्शनशी संबंधित एका सूत्राने सांगितलं की, इथं “व्हॅन” म्हणजे व्हॅनिटी व्हॅन नव्हे. तर या थायलंडमधल्या शूटदरम्यान वापरण्यात आलेल्या सामान्य वाहतूक गाड्या होत्या.

सूत्राने हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं, “धुरंधरच्या बँकॉक शेड्यूलदरम्यान वापरल्या गेलेल्या या थाई व्हॅन्स होत्या. शूटिंग दीर्घकाळ चालू असल्याने एक व्हॅनिटी व्हॅन आणि दोन साध्या गाड्या अभिनेता, त्यांचा स्टाफ आणि साहित्य वेगवेगळ्या लोकेशन्सवर नेण्यासाठी वापरण्यात आल्या होत्या.” सूत्रांच्या मते, बँकॉक शेड्यूलमध्ये बहुतेक सीन बाहेरच्या लोकेशन्सवर होते. संपूर्ण शहरात सतत हालचाल सुरू असल्याने आणि अनेक ठिकाणी शूटिंग करावी लागत असल्याने एवढी वाहतूक व्यवस्था आवश्यक होती.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

सूत्रांनी पुढे सांगितलं की रणवीर सिंहने या चित्रपटासाठी प्रचंड शारीरिक मेहतन घेतली आहे. कधी त्याने 15 किलो वजन घटवलं, तर कधी 25 किलो वजन वाढवलं, तेही काही महिन्यांत किंवा अगदी काही दिवसांत. यासोबतच त्याने रोज 12 ते 14 तास शूटिंग केली. इतक्या मोठ्या प्रमाणात बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी सेटवर जिम, खास आहार किंवा खासगी शेफ यांसारख्या सुविधांची गरज असते, जेणेकरून ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करता येईल. सूत्रांनी स्पष्ट केलं की रणवीरला कोणतीही ‘अतिरिक्त आलिशान सुविधा’ देण्यात आलेली नव्हती. तर केवळ शूटिंग आणि त्याच्या कामाच्या गरजेनुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

याशिवाय हेही समोर आलं आहे की धुरंधर आणि त्याचा पुढचा भाग धुरंधर: द रिव्हेंज यांचं शूटिंग एकाच वेळी करण्यात आलं होतं. सुरुवातीला हा चित्रपट एकाच भागात प्रदर्शित करण्याचा विचार होता. मात्र चित्रपटाची लांबी अधिक असल्याने नंतर तो दोन भागांत विभागण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.