Ranveer Singh Use Three Vanity Van During Dhurandhar Shoot: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमानं (Dhurandhar Movie) फक्त देशातच नाहीतर जगभरात डंका वाजवला. रिलीजनंतर दोन महिन्यांनीही या सिनेमाच्या चर्चा काही कमी झाल्या नाहीत.
आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट गेल्या वर्षी 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बरीच प्रसिद्धी मिळवली, त्यातील गाणी आणि पात्रांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. गेल्या आठवड्यातच हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झाला आणि तिथेही तो टॉपवरच आहे. अशातच आता 'धुरंधर' सिनेमाबाबत एक वेगळीच चर्चा रंगलीय. ती म्हणजे, रणवीर सिंहच्या तीन व्हॅनिटी व्हॅनबाबत.
सेलिब्रिटींच्या सुविधा, विशेषतः रणवीर सिंहच्या व्हॅनिटी व्हॅनविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सिनेमाच्या शेवटी दिलेल्या क्रेडिट लिस्टमध्ये रणवीर सिंह म्हणजेच, हमजाच्या 3 व्हॅनिटी व्हॅनचा उल्लेख होता. यावरुन रणवीर 3 व्हॅनिटी व्हॅन वापरतो अशी चर्चा झाली. आता यामागचं खरं सत्य समोर आलं आहे.

ओटीटी रिलीज झाल्यानंतर, चित्रपटावर आणखी टीका झाली. चाहत्यांनी क्रेडिट चार्टपासून ते चित्रपटाच्या आशयापर्यंत सर्व गोष्टींची छाननी केली. आता, रेडिटवर अशा पोस्ट ट्रेंड होत आहेत, ज्यात दावा केला जातोय की, रणवीर सिंहनं सिनेमासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन वापरल्या. या व्हायरल दाव्यामुळे पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये कलाकारांनी केलेल्या खर्चाबद्दल वाद निर्माण झालाय. रेडिटवरील अशाच एका विश्लेषणातून असं दिसून आलं की, सिनेमाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंहनं शूटिंग दरम्यान तीन व्हॅनिटी व्हॅन वापरल्या.
एका रेडिट युजरनं सिनेमाच्या शेवटच्या क्रेडिट्सचा स्क्रीनशॉट पोस्ट केला, तेव्हा वाद सुरू झाला, ज्यामध्ये हमजासाठी (रणवीरचं पात्र) तीन व्हॅन दाखवल्या गेल्यात, हमजाची व्हॅन, हमजाची स्टाफ व्हॅन आणि हमजाची नॉर्मल व्हॅन. यामुळे अभिनेत्यासाठी अतिरिक्त स्टाफवर इतके पैसे का खर्च केले गेले? यावरुन वाद निर्माण झाला आहे.

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानंतर, या प्रकरणाची चौकशी केली आणि स्पष्टीकरण देण्यासाठी प्रोडक्शन हेडशी बोलले. त्यात म्हटलंय की, 'व्हॅन' हा शब्द व्हॅनिटी व्हॅन नव्हे तर नियमित गाड्यांचा संदर्भ घेत होता. या व्हॅन सिनेमाच्या थायलंडमधील शुटिंगसाठी वापरल्या जात होत्या, जिथे अशा वाहनांचा वापर क्रू मेंबर्सना नेण्यासाठी केला जातो. सुत्रांनी सांगितल्यानुसार, "सिनेमाच्या शेवटच्या क्रेडिट्समध्ये उल्लेख केलेल्या व्हॅन 'धुरंधर'च्या बँकॉक शूटसाठी होत्या, ज्याचं शूटिंग शेड्यूल खूप लांबलचक होतं. कलाकार, कर्मचारी, सामान इत्यादींना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी एक व्हॅनिटी व्हॅन आणि दोन कार (थाई व्हॅन) ठेवण्यात आल्या होत्या..." बँकॉकमधील बाहेरील शूटसाठी, अनेक ठिकाणी आणि शहरातून वारंवार प्रवास करण्यासाठी हे आवश्यक होतं.