अमरावतीत एमआयएमच्या नगरसेविकेचा महापौर पदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा, कारवाई होणार  
प्रणय निर्बाण, एबीपी माझा February 06, 2026 07:43 PM

Amravati :  महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर पद कोणत्या पक्षाकडे जाणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. कारण काही ठिकाणी राजकीय पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळं तिथे इतर पक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेमध्ये देखील वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. एमआयएमच्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. त्यामुळं त्यांना पक्षातून निष्काशीत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमआयएमच्या गटनेत्यांनी दिली आहे.  

MIM च्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्काशीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.आमच्या पक्षाच्या विचारधारा घेऊन चालत आहो त्या विचारधारेच्या विरुद्ध जाणाऱ्यावर निश्चितच कारवाई होईल. MIM पक्षाच्या गटनेतेपदी मी असल्यानं पक्षाच्या सगळ्या 12 नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. तरीही मीराबाई कांबळे यांनी पक्षाच्या विरुद्ध जाऊन मतदान केल्याची माहिती  एमआयएमच्या गटनेत्यांनी दिली आहे.  

मिराबाई कांबळे नेमकं काय म्हणाल्या? 

महापौर हे मला चांगले वाटले काम करणारे वाटले म्हणून मी त्यांना मतदान केल्याची माहिती MIM च्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी दिली. मी माझे विचार मांडूनच मतदान केले. मला पक्षाने नाही सांगितले पण मला महापौर पदाचे उमेदवार हे चांगले वाटले विकास करणारे वाटले म्हणून मी मतदान केल्याची माहिती मिराबाई कांबळे यांनी दिली. पक्षाकडून कारवाई जर झाली तर मार्ग भरपूर असतात असेही त्या म्हणाल्या. 

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल इतके नगरसेवक निवडून आणता आले नाहीत. अमरावतीत भाजपनं 25 जागांवर विजय मिळवला असला तरी अमरावती महानगरपालिका निवडणुकीत बहुमतासाठी 44 नगरसेवकांची आवश्यकता आहे. अमरावती मनपाच्या निवडणुकीत बसपाचे तीन, शिवसेना शिंदे गटाचे तीन तर उबाठाचे दोन नगरसेवक विजय झाले आहेत. त्यामुळे सत्ता समीकरणात या तीनही पक्षांचे महत्त्व वाढले आहे.  तीन पक्ष महापौर पदासाठी किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा देखील या निमित्ताने जोर धरू लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने कामगिरी बजावली असून पक्षाचे 25 नगरसेवक विजय झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचा मित्रपक्ष युवा स्वाभिमानचे 15 तर काँग्रेसचे देखील 15 नगरसेवक आहेत.. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे 11 तर एमआयएमचे देखील 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.