सातशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भातविक्रीचे पैसे जमा
मुरबाड, ता. ५ (बातमीदार) ः तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाला हमीभाव योजनेंतर्गत विकलेल्या भाताचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. सातशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भातविक्रीचे पैसे जमा झाल्याची माहिती मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य चंद्रकांत बोष्टे यांनी दिली.
मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या भातखरेदी केंद्रावर भातविक्री करण्यासाठी आठ हजार ५९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर आतापर्यंत दोन हजार ३१० शेतकऱ्यांनी सुमारे ६० हजार क्विंटल भात विकले आहे, अशी माहिती शेतकरी सहकारी संघामार्फत देण्यात आली. मुरबाड तालुक्यात एकूण १६ हजार ५०० हेक्टर भातशेती आहे. त्यामध्ये आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्र, असे दोन भाग आहेत. बिगर आदिवासी भागातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी मुरबाड येथे तालुका शेतकरी सहकारी संघामार्फत केली जाते. ही खरेदी सुरू होऊन दोन महिने झाले असून, आता भाताचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्या सुरुवात झाली आहे.
आदिवासी क्षेत्रात भातखरेदी केंद्र नाही
आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यासाठी अद्यापही शासनातर्फे भातखरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षी मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात धसई, माळ, न्याहडी, पाटगाव पठार या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाकडून भातखरेदी केंद्रे चालवली जात होती. आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडून भातखरेदी लवकरात लवकर सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.