मालेगाव महापौर निवडणूक 2026: मालेगाव महापालिका इमारतीत आज मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाच सुदैवाने जीवितहानी टळली आहे. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्याने तसेच लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या लिफ्टमध्ये एकूण 18 नागरिक अडकले होते. चौथ्या मजल्यावरून खाली कोसळताना लिफ्ट थेट तळमजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्यावर लिफ्टचा दरवाजा अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे लिफ्टमधील सर्वजण सुखरूप राहिले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नाने लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एकामागोमाग एक बाहेर काढण्यात आले. या अपघाताच्या वेळी लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक पाच पत्रकारही अडकले होते. लिफ्ट कोसळल्यानंतर काही काळ महापालिका इमारतीत एकच गोंधळ उडाला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने महापालिका प्रशासन, राजकीय नेते, पत्रकार आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
दरम्यान, मालेगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली आहे. महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांची निवड झाली. महापौरपदासाठी झालेल्या थेट लढतीत शेख नसरीन बानो खालिद यांनी 43 मते मिळवत शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांचा 25 मतांच्या फरकाने पराभव केला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही शान-ए-हिंद यांनी 43 मते मिळवत शिवसेनेचे ॲड. निलेश काकडे यांच्यावर निर्णायक विजय मिळवला. या निवडणुकीत भाजप आणि एमआयएमने तटस्थ भूमिका घेतली. इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या एकत्रित ताकदीमुळे सत्तेचे समीकरण स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा