Viral Video: मुख्यमंत्र्यांनी दिली चक्क रामदेव बाबांना टक्कर! 'शीर्षासन' करतानाचा व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या शीर्षासनाचे फायदे
esakal February 08, 2026 01:45 AM

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव सध्या त्यांच्या एका खास 'योगा' व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. हरिद्वारमधील पतंजली योगपीठात चक्क योगगुरू बाबा रामदेव यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांनी असे काही कसब दाखवले की, उपस्थित सर्वजण अवाक झाले.

आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो, पण मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या फिटनेसने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हरिद्वारमधील पतंजली गुरुकुलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात डॉ. यादव यांनी बाबा रामदेव यांच्यासोबत योगासने केली. विशेष म्हणजे, त्यांनी योगामधील सर्वात कठीण मानले जाणारे 'शीर्षासन' अत्यंत सहजतेने करून दाखवले.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे. नेटकरी मुख्यमंत्र्यांच्या लवचिकतेचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, "आज बाबा रामदेव यांना त्यांच्या ताकदीचा स्पर्धक मिळाला आहे. मुख्यमंत्री असूनही मोहन यादव यांचा फिटनेस एखाद्या योगा शिक्षकापेक्षा कमी नाही."

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हरिद्वारच्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व सांगितले. "हरिद्वार हे केवळ धार्मिक शहर नसून ते आपल्या देशाच्या गौरवाचे आणि नवीन सुरुवातीचे केंद्र आहे," असे ते म्हणाले. बाबा रामदेव यांनीही मुख्यमंत्र्यांच्या उत्साहाचे आणि शिस्तीचे कौतुक केले.

राजकारणाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून स्वतःला फिट ठेवणारा मुख्यमंत्री पाहून मध्य प्रदेशच्या जनतेमध्येही आता योगाबद्दलची ओढ वाढताना दिसत आहे.

योगासनांमध्ये शीर्षासनाला 'आसनांचा राजा' म्हटले जाते. मुख्यमंत्री मोहन यादव यांचा व्हिडिओ पाहून अनेकजण हे आसन करण्यासाठी उत्सुक असतील, पण ते करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि नियम जाणून घेणे गरजेचे आहे.

शीर्षासनाचे जबरदस्त फायदे

मेंदूची कार्यक्षमता वाढते: डोके खाली आणि पाय वर केल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होते.

केसांच्या आरोग्यासाठी उत्तम: डोक्याकडील रक्तप्रवाह वाढल्यामुळे केस गळणे कमी होते आणि अकाली पांढरे होणाऱ्या केसांची समस्या सुटते.

चेहऱ्यावर चमक येते: रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि पिंपल्सचा त्रास कमी होतो.

पचनक्रिया सुधारते: या आसनामुळे पोटातील अवयवांवर दाब पडतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या तक्रारी दूर होतात.

तणाव कमी होतो: नियमित शीर्षासन केल्याने मानसिक शांतता मिळते आणि झोप न येण्याची समस्या (Insomnia) कमी होते.

हे आसन करताना कोणती काळजी घ्यावी?

महत्त्वाची टीप: हे आसन अतिशय कठीण आहे, त्यामुळे सुरुवातीला भिंतीचा आधार घेऊन किंवा योगा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

झटकन हालचाल टाळा: आसन करताना किंवा सोडताना कधीही घाई करू नका. शरीराचा समतोल राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.

मानावर ताण देऊ नका: शरीराचा सर्व भार मानावर न टाकता हातांच्या कोपरांवर आणि खांद्यावर असावा.

वेळेचे बंधन: सुरुवातीला केवळ १० ते २० सेकंद हे आसन करा. सवय झाल्यावर हळूहळू वेळ वाढवा.

आसन सोडल्यानंतर: शीर्षासन सोडल्यानंतर लगेच उभे राहू नका. काही वेळ 'शवासन' किंवा 'बालासना'मध्ये विश्रांती घ्या, जेणेकरून रक्तप्रवाह सामान्य होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.