Mhada House: घरांसाठी म्हाडाला भूखंडाची प्रतीक्षा, नवीन प्रकल्पांवर मर्यादा; नेमकं कारण काय?
esakal February 09, 2026 08:45 AM

मुंबई : म्हाडाकडून मुंबईसह महामुंबईत सर्वसामान्यांसाठी हजारो परवडणारी घरे उभारली जात असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे; मात्र म्हाडाच्या कोकण मंडळाचे कार्यक्षेत्र असलेल्या महामुंबईतील परवडणाऱ्या घरासाठीच्या मोठ्या जागाच संपल्या आहेत. त्यामुळे कोकण मंडळाने ठाणे, पनवेल, पालघरमधील तब्बल ३५० हेक्टर सरकारी जमिनी मिळाव्यात, अशी मागणी पाच महिन्यांपूर्वी सरकारकडे केली होती. त्यावर अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने म्हाडाला भूखंडाची प्रतीक्षा आहे. तसेच भूखंड नसल्याने नवीन गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यावर मर्यादा येत आहेत.

मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सर्वसामान्यांकडून ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, वसई, विरारमध्ये तुलनेने स्वस्त असलेल्या घरांना पसंती दिली जात आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने २०२५ मध्ये काढलेल्या ठाणे, नवी मुंबईतील ५,३६२ घरांच्या लॉटरीत प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल एक लाख ८४ हजारहून अधिक अर्ज आले आहेत.

Mumbai High Court: वृक्षांचे संरक्षण आवश्यक! उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला फटकारले

त्यामुळे म्हाडाच्याघराला मोठी पसंती दिली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच भाग म्हणून कोकण मंडळाकडून आणखी गृहनिर्माण योजना राबवण्याचे नियोजन आहे; मात्र सध्या कोकण मंडळाकडे परवडणाऱ्या घराचे मोठे प्रकल्प राबवण्यासाठी जागाच नसल्याने सरकारने आणखी जागा द्यावी, अशी मागणी कोकण मंडळाने केली होती.

आधी पायाभूत सुविधा उभारा!

कोकण मंडळाकडे सध्या घरे बांधण्यासाठी जागेची चणचण आहे. त्यामुळेच सरकारकडे जागेची मागणी केली आहे. ही जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तत्काळ घरे उभारणे शक्य नाही. या भूखंडाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिन्या, ड्रेनेज सिस्टीम अशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास त्या उभाराव्या लागतील. त्यामुळे सरकारने जमीन दिल्यानंतरही तत्काळ घरे उभारता येत नाहीत. त्यामुळे जेवढ्या लवकर भूखंड उपलब्ध होतील तेवढ्या लवकर घरे उभारणे शक्य होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सरकारी जमिनी म्हणजे काय?

कोकण मंडळाने प्रामुख्याने ठाणे, पनवेल आणि पालघर जिल्ह्यातील सरकारी जमिनी मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. सरकारी जमिनी म्हणजे ज्या जमिनीचा आकार संबंधिताने न भरल्याने त्या महसूल विभागाकडे जप्त केल्या जातात. त्याला आकार पड जमीन संबोधले जाते. त्या जमिनी केवळ सरकारी प्रकल्पांसाठी देता येतात.

Mumbai Water Supply: मुंबईत मोठी पाईपलाईन दुरुस्ती; 'या' दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार, पण कोणत्या भागात? वाचा यादी... म्हाडाने मागणी केलेले भूखंड
  • पनवेल

आडीवली - ६.३ हेक्टर

उसरली - १.१७ हेक्टर

पनवेल - १३.४ हेक्टर

  • ठाणे

कळवा - १८.५३ हेक्टर

चिखलोली - ४.४५ हेक्टर

खिडकाळी - ९.६३ हेक्टर

दापोडे - २६.०७ हेक्टर

बापगाव - ३६.७५ हेक्टर

ठाणे - १५.२७ हेक्टर

ठाणे - ३९ हेक्टर

माजिवडा - १३ हेक्टर

  • पालघर

वसई - ४.६६ हेक्टर

जूचंद्र - २० हेक्टर

नंडोरे - ६.१७ हेक्टर

पालघर - ११.५१ हेक्टर

पालघर - ८९.५९ हेक्टर

सध्या एमएमआरमध्ये घरांना मोठी मागणी असून होऊ घातलेल्या ग्रोथ हबमुळे आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे कोकण मंडळाने ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये घरांच्या निर्मितीसाठी सरकारने जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत दोन वेळा स्मरणपत्रे पाठवली आहेत. लवकरच जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे.

- डाॅ. विशाल राठोड, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ (म्हाडा)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.