बोरिवलीत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई; मनसेच्या आंदोलनानंतर हालचालींना वेग
कांदिवली, ता. ८ (बातमीदार) : बोरिवली परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिकेच्या ‘आर-मध्य’ विभागाने ७ फेब्रुवारी रोजी कारवाई करत प्रेमनगर, योगीनगर आणि रोकडिया लेन येथील अतिक्रमणे हटविली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका मराठी व्यावसायिकावर झालेल्या कारवाईनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते.
स्थानिक पातळीवर झालेल्या कारवाईबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी चर्चा केली. उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे, शाखाध्यक्ष प्रकाश माने आणि पदाधिकारी वैभव बोरकर यांच्या नेतृत्वाखाली योगीनगर येथील महापालिकेच्या गोदामाजवळ आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी मनसेचे उपशहराध्यक्ष कुणाल माईणकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आर-मध्य’ विभागाचे सहाय्यक आयुक्त तांबे व कासारे यांची भेट घेण्यात आली. “प्रशासकीय कारवाई सर्वांसाठी समान असावी. कोणत्याही व्यावसायिकावर पक्षपाती कारवाई होता कामा नये,” अशी भूमिका मनसेकडून मांडण्यात आली. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात व्यापक कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने त्यानंतर प्रेमनगर, योगीनगर आणि रोकडिया लेन परिसरात धडक कारवाई केली. रस्ते व्यापून बसलेल्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले. संबंधित कारवाई नियमित अतिक्रमणविरोधी मोहिमेअंतर्गत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.