Pune ZP Election Result Updates: पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून, जिल्ह्याच्या राजकारणात कोणाचं वर्चस्व राहणार याबाबत उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीने सर्वच पक्षांची ताकद पुन्हा एकदा पणाला लावली आहे.
पुणे: यंदा पुणे जिल्ह्यात सरासरी सुमारे 68.89 टक्के मतदान झालं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी असली, तरी ही लढत केवळ आकड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पक्ष, ग्रामीण प्रश्न, स्थानिक नेतृत्व आणि पक्षीय समीकरणं यामुळे पुढचं राज्याचं राजकारण बदलणार आहे. बारामतीतील निवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, प्रचारातील मर्यादा, स्थानिक वातावरण आणि मतदारांमधील उदासीनता ही संभाव्य कारणं मानली जात आहेत. इतर तालुक्यांमध्येही मतदानाची चित्र बदललं आहे, मावळ, भोर, शिरूर आणि खेडमध्ये चांगला प्रतिसाद दिसून आला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं मतदान झालं आहे.
या निवडणुकीतला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आपली पकड कायम ठेवणार की शिवसेना, भाजपला संधी मिळणार? मागील काही वर्षांत जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलली असून, अनेक ठिकाणी नवं नेतृत्व पुढे आलं आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळणार की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची अवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगार हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी होते. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक नेते, गटबाजी आणि व्यक्तीकेंद्रित लढती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभा टाळून थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर देण्यात आल्याचंही अनेक भागांत पाहायला मिळालं.
जुन्नर : 61.18
आंबेगाव : 65.30
शिरूर : 75.59
खेड : 75.46
मावळ : 77.43
मुळशी : 63.79
हवेली : 68.02
दौंड : 65.00
पुरंदर : 68.37
वेल्हे : 79.30
भोर : 75.62
बारामती :54.90
इंदापूर : 65.67
एकूण 68.89
मुळशी पिरंगुट - भूगाव गट -
या गटामध्ये मागील पंचवार्षिकमध्ये एकत्रित निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
वेल्हे विंझर जिल्हा परिषद गट
या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल नलावडे, भाजपाकडून शिवराज शेंडकर तर पुणे जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक रेवणनाथ दारवटकर यांचे चिरंजीव अनंता दारवटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत रिंगणात असून राष्ट्रवादीचे नलावडे भाजपाचे शेंडकर तर शिवसेनेकडून दारवटकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
भोर जिल्हा परिषद गट उत्रोली - कारी
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि एक वेळी पंचायत समिती सदस्य असलेले रणजीत शिवतरे आणि भाजपाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपात होते यांच्यामध्ये चूरशीची लढत होणार आहे
पुरंदर बेलसर - माळशिरस गट
बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते व काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांच्यासह शिवसेनेचे रमेश इंगळे,भाजपचे अजय इंगळे,शिवसेना (उबाठा)चे अमोल कामठे यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे.
इंदापूर
वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवीत असून या ठिकाणी पूर्वी राष्ट्रवादीकडूनच पंचायत समिती सदस्य म्हणून असलेले सतीश पांढरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत.
दौंड केडगाव बोरीपार्धी गट -
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात विरुद्ध भाजपाचे बोरीपार्धीचे येथील माजी आमदार कै. काकासाहेब थोरात यांचे नातू तथा भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांची चिरंजीव अभिषेक थोरात यांच्यामध्ये चुरशीची लढत
शिरूर वडगाव मांडवगण फराटा गट -
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार विरुद्ध भाजपाचे वडगाव रासाई येथील सरपंच सचिन शेलार व स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तसेच घोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांच्यामध्ये चुरशीची तिरंगी लढत..
हवेली खेड शिवापूर खानापूर गट
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पांगारे यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य पूजा पारगे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्या पत्नी रुपाली रमेश कोंडे यांच्यामध्ये चुरशीची लढत.
जुन्नर नारायणगाव - वारूळवाडी गट -
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच महेश शेळके यांच्या पत्नी व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके व शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. नारायणगाव - वारूळवाडी गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
आंबेगाव पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक जारकरवाडी गट –
या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी सहकारमंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील विरुद्ध शिवसेनेचे अरुण गिरे यांच्यामध्ये चुरशीची लढत.. दोघांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. अरुण गिरे यांनी नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. या गटात भाजपचे किरण वाळुंज व एक अपक्ष हि रिंगणात आहे.
खेड
आंबेठाण-पाईट या जिल्हा परिषद गटात तब्बल वीस वर्ष हा गट ताब्यात ठेवणारे शरद बुट्टेपाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टेपाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.तर त्यांच्या विरोधात खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी आणि बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांच्या आई राजश्री जैद या शिवसेना ( उबाठा ) माध्यमातून निवडणूक लढवत आहे.तर शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून माजी आमदार स्व.सुरेश गोरे यांच्या चुलत भावजय निशा गोरे निवडणूक लढवित आहे. त्यामुळे येथे तालुक्यातील सर्वाधिक चुरशीची लढत पहायला मिळत आहे.