नेरच्या काशीविश्वेश्वर मंदिरात
उद्यापासून धार्मिक कार्यक्रम
पुसेगाव, ता. १३ : नेर (ता. खटाव) येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्री पर्वकाळानिमित्त रविवारी (ता. १५) व सोमवारी (ता. १६) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
महाशिवरात्रीनिमित्ताने या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. रविवारी (ता. १५) पहाटे सहा वाजता महाभिषेक व शिवआरती ग्रामस्थ आणि भाविकांच्या हस्ते होईल. सकाळी आठ वाजता मंदिर परिसरात भाविकांसाठी फलाहार व खिचडीची सोय केली आहे. सकाळी दहानंतर माहेरवाशिणींसाठी साडीचोळी भेट व हळदी- कुंकवाचा कार्यक्रम होईल. दुपारी दोन ते चार नेर येथील माऊली महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री नऊ वाजता माऊली सेवा भजन मंडळ, नेर यांच्या सुश्राव्य भजनानंतर रात्री १२.२७ ते १.१७ निशिथककालीन शिवपूजन सोहळा होईल.
सोमवारी (ता. १६) सकाळी दहा ते १२ सातारा येथील ज्ञानेश्वरी व इतिहास अभ्यासक हभप आझाद महाराज गुजर यांचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात केले आहे.
पंचक्रोशीतील शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी सरपंच सुरेश चव्हाण व ग्रामस्थांनी केले आहे.
---------------------------