Ind Vs Pak : भारताविरुद्धच्या मॅचआधीच पाकिस्तान दहशतीत ! हा स्टार खेळाडू ठरणार धोकादायक
admin February 14, 2026 03:24 PM

आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत उद्या, म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहेत. भारत वि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात ही मॅच होणार असून सामन्यापूर्वीच वातावरण चांगलंच तापलं आहे. या मॅचमध्ये भारत पाकिस्तानला लोळवतो की पाक विजयी कामगिरी करून दाखवतो याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलं आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी सध्या ज्या भारतीय खेळाडूची सर्वाधिक चर्चा सुरू आहे, तो म्हणजे टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या. नामिबियाविरुद्धच्या त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानच्या छावणीत टेन्शन वाढलं आहे. हा स्टार खेळाडू अतिशय धोकादायक ठरू शकतो.

नामिबियाविरुद्ध केली तूफान कामगिरी

टी-20 वर्ल्डकपमध्ये नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने कठीण परिस्थितीत टीम इंडियाला सावरले. जेव्हा मधल्या फळीवर दबाव येत होता, तेव्हा त्याने फक्त 28 चेंडूत 52 धावांची जलद खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. शिवाय, त्याने महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि सामनावीराचा पुरस्कारही मिळवला.

पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेही केलं कौतुक

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनेही एका चर्चेदरम्यान भारतीय संघाच्या रणनीतीचे आणि हार्दिकच्या खेळीचे कौतुक केले. खेळपट्टी मंदावल्यानंतर भारतीय फलंदाजांनी परिस्थितीशी जुळवून घेतले आणि स्ट्राईक फिरवून डाव पुढे नेला असं तो म्हणाला. दबावाखाली सामने कसे हाताळायचे हे पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूंना भारतीय खेळाडूंकडून शिकण्याची आवश्यकता आहे असेही मलिकने कबूल केलं.

हार्दिकसारखा ऑलाराऊंडर जगात नाही

दरम्यान, पॅनेलमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका तज्ज्ञाने हार्दिक पांड्या, हा इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा श्रेष्ठ असल्याचे वर्णन केले आहे. हार्दिक हा असा अष्टपैलू खेळाडू आहे जो फलंदाजी करताना एक विशेषज्ञ फलंदाज आणि गोलंदाजी करताना एक प्रमुख गोलंदाज असल्याचे दिसून येतं. हार्दिकसारखा संतुलित अष्टपैलू खेळाडू केवळ पाकिस्तानातच नाही तर जगातही सापडणे कठीण आहे असंही ते म्हणाले.

15 फेब्रुवारीला ठरू शकतो मॅच विनर

आता उद्या, 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येतील तेव्हा हार्दिक पंड्याची कामगिरी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तो असा खेळाडू आहे जो, त्याच्या बॅटने आणि बॉलने सामन्याचे चित्र बदलू शकतो. गेल्या काही सामन्यांमधील त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी दिलासादायक आहे. पाकिस्तानच्या संघाकडून, भारतीय टॉप ऑर्डरला लवकर बाद करण्याची रणनीती आखली जाईल, तेव्हा हार्दिकसारखे खेळाडू मधल्या फळीत येऊन गेम चेंजर ठरू शकतात.
अशा परिस्थितीत, हार्दिक पुन्हा एकदा त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीने टीम इंडियाला हा मोठा सामना जिंकण्यास मदत करू शकतो की नाही हे पाहणे महत्वाचे असेल.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.