Latest Marathi News Live Update : भिवंडीत महापौर पदासाठी ३ जणांमध्ये लढत
esakal February 20, 2026 04:45 PM
Live: भिवंडीत महापौर पदासाठी ३ जणांमध्ये लढत

भिवंडीत 9 पैकी 6 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. महापौर पदासाठी आता नारायण चौधरी, आणि विलास पाटील आणि स्नेहा पाटील तिघांमध्ये लढत होणार आहे

Solapur Live: सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ

- सोलापूर महापालिका सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ

- भाजपकडून 9 सदस्यांची निवड आज होणार होती मात्र 8 सदस्यांची नावे जाहीर केल्याने विरोधी पक्ष नगरसेवकांनी घातला गोंधळ

- शिवसेना नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे यांनी घेतला आक्षेप

- महापौर विनायक कोंड्याल यांच्या दालनात शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी घेतली धाव

- महापौर विनायक कोंड्याल यांनी वाढता तणाव लक्षात घेऊन सभागृहाचे कामकाज थांबवले

Live: शिवजयंती मिरवणुकीत विना परवाना डीजेवरून वाद, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

नांदेडमध्ये शिवजयंती मिरवणुकीत पोलिसांनी सौम्य स्वरूपाचा लाठीमार केलाय, या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विना परवाना लावलेला डीजे काढण्यास पोलीस गेले होते, त्यावेळी तरुणांनी त्याला विरोध केला. यावेळी पोलिसांनी सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज केला. मात्र या घटनेनंतर युवकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. पोलीस जाणीवपूर्वक आम्हाला टारगेट करत आहेत असा आरोप युवकांनी केला. तर विनापरवाना लावलेला डीजे ताब्यात घेत असताना डीजेचे सामान पळून नेत असल्याने आम्ही रोखण्याचा प्रयत्न केल्याची माहिती भाग्यनगर पोलिसांनी दिली आहे.

Live: अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरवात

- पहिल्याच सर्वसाधारण सभेला 15 पेक्षा अधिक नगरसेवकांची दांडी..

- सातव्यांदा नगरसेवक म्हणून विजयी झालेले काँग्रेस पक्षाचे नेते माजी महापौर विलास इंगोले यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड

- विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झालेले विलास इंगोले हे अमरावती महानगरपालिकेतील सर्वात जेष्ठ नेते

- सत्ता पक्षांचा सभागृह नेता म्हणून भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड.

Sahajpur Live: शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीला सुरुवात, शेतकरी आक्रमक

सहजपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची संयुक्त मोजणी सुरू होताच वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मोजणीला जोरदार विरोध करत शेतकऱ्यांनी गोळ्या घाला पण जमीन मोजू देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला आहे. संयुक्त मोजणीविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Kolhapur Live : कोल्हापूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राजकीय वातावरण तापलं

कोल्हापूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून आज शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते सुनील कदम यांनी काँग्रेसकडून स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज केलेल्या सुनील मोदी यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या निवडीला तीव्र विरोध दर्शवला आहे. या आरोपांमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे फेरे सुरू झाले आहेत, तर या निवडीवरून पुढील राजकीय दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Live: संजय राऊत उद्या सकाळी अकरा वाजता मालेगाव न्यायालयात हजर राहणार

गिरणा सहकारी साखर कारखान्याबाबत केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्याच्या प्रकरणात संजय राऊत उद्या सकाळी अकरा वाजता मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. या वक्तव्यावरून दादा भुसे यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. मागील तारखेला सुनावणीस अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने संजय राऊत यांच्यावर एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी उद्या ते मालेगाव कोर्टात उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Live: गुंतवणुकीच्या नावाखाली मोठा फसवणूक प्रकार; टीडब्ल्यूजे कंपनीकडून शहरातही १० कोटींचा गंडा

राज्यातील विविध मोठ्या शहरांमधील सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांना प्रचंड परताव्याचे आमिष दाखवत तब्बल १२०० कोटींची फसवणूक करणाऱ्या TWJ Companyने आता छत्रपती संभाजीनहरमध्येही सुमारे १० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आकर्षक स्कीम्स, जलद नफा आणि विश्वासार्हतेचे भासवलेले दावे याच्या जोरावर अनेक स्थानिक गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यात आले, तर काहींची आयुष्यभराची बचतही या प्रकरणात अडकली आहे. तक्रारी वाढल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून, कंपनीच्या प्रतिनिधींचा शोध घेतला जात आहे.

जळगावमध्ये प्रशासक नियुक्तीला सरपंचांचा विरोध आज ग्रामपंचायत बंद

जळगावमध्ये प्रशासक नियुक्तीला सरपंचांचा विरोध आज ग्रामपंचायत बंद

जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्या ठिकाणी प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र निवडणुका तातडीने घेण्याऐवजी प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला सरपंच व पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. निवडणुका होईपर्यंत विद्यमान सरपंच व उपसरपंचांकडेच जबाबदारी द्यावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीसाठी आज 'ग्रामपंचायत बंद'चा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कालावधी डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत टप्याटप्याने संपला.

पहिल्या टप्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महापालिका निवडणुकांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित राहिल्या. सध्या राज्यभर ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असला तरी नियमित निवडणुकांबाबत हालचाल नसल्याने प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा,आमडापूर आणि कोठाळा या ३ गावच्या परिसरात आज शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी केली जाणार आहे मात्र या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

पोलिसानी आज पहाटेच या महामार्गाला विरोध करणाऱ्या विविध पक्ष,संघटना आणि काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.ज्या ३ गावात जमीन मोजण्यासाठी अधिकारी येणार आहेत या अधिकाऱ्यांना आमचा जीव गेला तरी आम्ही आमची जमीन आम्ही मोजू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे यामुळे शेतकरी आज मोठ्या संख्येने एकवटले आहेत.

शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर बैलगाड्या उभा करून आम्ही आमच्या शेताकडे अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही असे म्हणत रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे.कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला मोजणी करायची असल्याने प्रचंड मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे ज्यामुळे छावणीचे स्वरूप या परिसराला आले आहे.

Sanjay Live : उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर जाणं कठीण नाही- संजय राऊत

उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर जाव ही सर्वांची इच्छा आहे, आणि ते कठीण नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Devendra fadnavis Live : भारताने AI क्षेत्रात मोठी शक्ती निर्माण केली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एआय अनेक संकटांचा पूर्व अंदाज लावू शकते.भारताने AI क्षेत्रात मोठी शक्ती निर्माण केली, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते एआय समिटमध्ये बोलत होते.

Mumbai Live : मुंबईतील काही भागात धुक्याचा थर

मुंबईच्या काही भागात धुक्याचा थर पसरला आहे. वरळी, हाजी अली परिसरातील दाट धुके पाहायला मिळत आहे.

सुवर्णदुर्ग ते गोवा किल्ला रोपवे प्रकल्पाला शासनाकडून मंजुरी

दापोली : पर्यटनवाढीसाठी सुवर्णदुर्ग ते गोवा किल्ला रोपवे प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली आहे, तसेच किल्ल्याजवळ जेटी उभारणीसाठी ८ कोटींचा निधीही दिला आहे. त्यामुळे हर्णैतील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

Winter Session : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाचा निवास खर्च नऊ कोटी ७३ लाख

बेळगाव : बेळगावातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा खर्च पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केवळ निवास व्यवस्थेचे बिल तब्बल नऊ कोटी ७३ लाख रुपये खर्च झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. गतवर्षी म्हणजे २०२४ साली हा खर्च सुमारे आठ कोटी होता. म्हणजेच यंदा जवळपास दोन कोटींची वाढ झाली आहे.

British Police : राजे चार्ल्स यांच्या भावाला ब्रिटिश पोलिसांनी केली अटक

लंडन : मुलींच्या लैंगिक शोषणाचे रॅकेट चालविणाऱ्या जेफ्री एपस्टीनशी असलेले संबंध उघड झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले किंग चार्ल्स-तृतीय यांचे धाकटे बंधू आणि राजपुत्र अँड्रू माउंटबॅटन- विंडसर यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली.

Nagpur 10th Exam : नागपूर जिल्ह्यात 58 हजार 458 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; आज पहिला पेपर मराठी

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूर जिल्ह्यात 58 हजार 458 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. पहिला पेपर मराठीचा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार 368 विद्यार्थी संख्येत वाढ झाली असून परिक्षेकरिता 222 केंद्रे निश्चित केली आहेत.

Feroz Sheikh : केईएम रुग्णालयातील मोबाईल चोरी प्रकरण उघड; फिरोज शेख अटकेत

परळ येथील केईएम रुग्णालय परिसरात सुरू असलेला मोबाईल चोरीचा प्रकार भोईवाडा पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी 40 वर्षीय फिरोज इस्माईल शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 9 मोबाईल (किंमत सुमारे 1 लाख रुपये) जप्त करण्यात आले. 4 जानेवारी रोजी एका डॉक्टरांचा सॅमसंग A54 मोबाईल चोरीला गेल्यानंतर तपास सुरू करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. 16 फेब्रुवारी रोजी पहाटे सापळा रचून शेखला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Maharashtra SSC Exam 2026 : राज्यात दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा आज शुक्रवारपासून (२० फेब्रुवारी) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ८७९ विद्यार्थी वाढले आहेत. ही परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहे. 

PM Modi : 'एआय'चे लोकशाहीकरण करणे ही काळाची गरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Latest Marathi Live Updates 20 February 2026 : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी जबाबदार प्रशासनाची स्पष्ट चौकट उभारणे आणि ‘एआय’चे लोकशाहीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानव इतिहासातील परिवर्तनकारी टप्पा असून, तिचा उपयोग मानवकल्याण, समावेशक विकास आणि जागतिक सहकार्यासाठी व्हायला हवा, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. भारताचा मानवकेंद्री दृष्टिकोन मांडताना मोदींनी ‘मानव’ ही संकल्पना मांडली. नैतिकता, जबाबदार प्रशासन, सार्वभौमत्व, सर्वसमावेशकता आणि वैधता या पाच स्तंभांवर ‘एआय’चे प्रशासन उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.