देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची हवा सध्या आरोग्यासाठी अतिधोकादायक वळणावर पोहोचली आहे. गेल्या ७ वर्षांतील फेब्रुवारी महिन्याचा आढावा घेतल्यास यंदा मुंबईने प्रदूषणाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. शुक्रवारी मुंबईचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३४४ च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी परिस्थिती अनुभवावी लागत आहे.
७ वर्षांतील भीषण वास्तव२०२० ते २०२६ या कालावधीवर नजर टाकल्यास, ७ वर्षांपूर्वी २०२० मध्ये याच फेब्रुवारी महिन्यात सरासरी AQI ९१ होता. मात्र, यंदा १०, १८ आणि १९ फेब्रुवारी हे तीन दिवस वगळता संपूर्ण महिनाभर प्रदूषणाचा आकडा १०० च्या पार राहिला आहे. त्यामुळे गेल्या ७ वर्षांत प्रथमच मुंबईने घातक हवेची पातळी ओलांडली आहे. यामुळे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई आता १५७ व्या स्थानावर पोहोचली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सकाळी दक्षिण मुंबईसह उपनगरांत धुके आणि धुरक्याचे (Smog) साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंकवर दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
| विभाग | AQI पातळी | श्रेणी |
| चांदिवली | २३८ | खराब |
| मालाड पश्चिम | २४० | खराब |
| BKC (वांद्रे-कुर्ला संकुल) | २३४ | खराब |
| नवी मुंबई | २६७ | चिंताजनक |
| आरामनगर | १८६ | मध्यम-खराब |
| अंधेरी पूर्व | १६१ | मध्यम |
| कुर्ला | २१२ | खराब |
हवामान तज्ज्ञांच्या मते, हवेतील PM-2.5 चे प्रमाण १८१ मायक्रोग्रॅम आणि PM-10 चे प्रमाण २१० मायक्रोग्रॅमवर पोहोचले आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा वाढला आहे. यामुळे नागरिकांना डोकेदुखी, अस्वस्थता आणि दम्याचा त्रास जाणवत आहे. सध्या मुंबईतील AQI १५० ते ३०० च्या दरम्यान असल्याने श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींसाठी तो जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान मुंबईतील या वाढत्या वायू प्रदूषणामागे बांधकामांमधून उडणारी धूळ, वाहनांचा धूर आणि बदलणारे हवामान ही प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे. विशेषतः मुंबई महापालिकेने (BMC) धूळ नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली, तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत आहे. त्यामुळे सकाळी लवकर फिरणे टाळावे आणि घराबाहेर पडताना एन-९५ मास्कचा वापर करावा. पुढील काही दिवसांत तापमानात वाढ झाल्यास आणि वाऱ्याचा वेग मंदावल्यास ही गुदमरून टाकणारी स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.