माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण; दहा कोटींचे होते बक्षीस
esakal February 23, 2026 01:45 AM

माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजी आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम या दोघांसह १५ हून अधिक सशस्त्र माओवाद्यांनी रविवार (ता. २२) तेलंगणा राज्यातील आसिफाबाद पोलिसांपुढे शरणागतीप पत्करल्याची माहिती मिळाली आहे.

एप्रिल-मे २०२५ मध्ये छत्तीसगडच्या १० हजारांहून अधिक पोलिसांनी करेगुट्टा पहाडावर माओवाद्यांना घेरले होते. या अभियानादरम्यान २१ मे रोजी माओवाद्यांचा देशातील सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू ठार झाला. त्यानंतर तिरुपती थिप्परी उर्फ देवजी यास राष्ट्रीय महासचिव बनविण्यात आले होते. बसवा राजूच्या मृत्यूनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली.

१८ नोव्हेंबर २०२५ ला माओवाद्यांच्या मिलिटरी कमांडचा प्रमुख माडवी हिडमा आणि त्याच्या पत्नीला छत्तीसगड पोलिसांनी ठार केले. त्यानंतर सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजी हा शरण येणार अशी चर्चा होती. अखेर रविवारी देवजीने तेलंगणातील मुलूगू जिल्ह्यात शस्त्रासह शरणागती पत्करली. तेलंगणा पोलिसांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी, गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक ते दोन दिवसात ही घोषणा होऊ शकते.

दहा कोटींचे होते बक्षीस...

मूळचा तेलंगणातील करीमनगर (जगतीयाल जिल्हा) येथील रहिवासी असलेल्या देवजीवर महाराष्ट्र, तेलंगणासह विविध राज्यांत एकूण दहा कोटींचे बक्षीस होते. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच त्याची संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. मे २०२५ मध्ये सुरक्षा दलांनी तत्कालीन सर्वोच्च नेता नंबाला केशव राव ऊर्फ बसवराजू याला एका चकमकीत ठार केल्यानंतर देवजीकडे संघटनेची सूत्रे आली होती. केवळ देवजीच नव्हे, तर त्याच्यासोबत १५ ते २० सशस्त्र सदस्यांनी शरणागती पत्करल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maoist Commander Killed : तब्बल एक कोटींचा इनाम असलेल्या माओवादी कमांडरसह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा! माओवाद्यांची 'डेथ लाइन' मार्च २०२६

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून माओवाद समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट सुरक्षा यंत्रणांना दिले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमावर्ती भागात माओवादविरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत तेलंगणाशी संबंधित अनेक जहाल माओवाद्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये शरणागतीप पत्करली आहे. यापूर्वी पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ सोनू, केंद्रीय समिती सदस्य आशन्ना उर्फ रूपेश हे जहाल माओवादी नेते शरण आल्याने माओवादी संघटना अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेली 'डेड लाइन' माओवादाची 'डेथ लाइन' ठरणे निश्चित मानले जात आहे.

आता उरले मोजकेच...

देवजीचे मूळ नाव थिप्पीरी तिरुपती असले, तरी माओवादी चळवळीत तो'संजीव' किंवा 'पल्लव' या टोपणनावांनीही ओळखला जायचा. तो एका दलित कुटुंबातील आहे. विशेष म्हणजे तो संघटनेचा एक महत्त्वाचा रणनीतीकार मानला जात होता. भूपतीच्या शरणगतीनंतर तो माओवादी चळवळीचा सर्वोच्च नेता होता. देवजीनंतर आता या चळवळीत मोजकेच नेते शिल्लक आहेत. त्यात मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती (वय ७५), मिशीर बेसरा (वय ६३), मल्ला राजी रेड्डी उर्फ संग्राम वय (७३)यांचा समावेश आहे. त्यातील गणपती तर प्रकृती अस्वस्थामुळे अनेक दिवसांपासून भूमिगत असल्याचे कळते. देवजीच्या शरणागतीनंतर चळवळीची जबाबदारी मिशीर बेसराकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चर्चांना मिळाला पूर्णविराम...

नोव्हेंबर २०२५ मध्ये आंध्र प्रदेशातील जंगलात झालेल्या एका चकमकीत जहाल माओवादी हिडमा मारला गेल्यानंतर देवजी आणि मल्ला राजी रेड्डी हे आंध्र प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत, असा आरोप नागरी हक्क संघटनांनी केला होता. या नेत्यांना न्यायालयात हजर करावे यासाठी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस (Habeas Corpus) याचिका देखील दाखल केली होती. देवजीची पुतणी थिप्परी सुमा हिने सोशल मीडियावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना पत्र लिहून देवजीच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती देण्याची आणि त्याला कायदेशीर प्रक्रियेद्वारे न्यायालयात सादर करण्याची मागणी केली होती.

तसेच माओवादी संघटनेचा प्रवक्ता विकल्प याने देवजी आणि मल्ला राजी रेड्डी पोलिसांच्या ताब्यात नसून ते सुरक्षित ठिकाणी आहेत, असा दावा नोव्हेंबर २०२५ मध्ये केला होता. मात्र आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यावेळी उच्च न्यायालयात देवजी आपल्या ताब्यात असल्याचे नाकारले होते अखेर रविवारी देवजीने तेलंगणा पोलिसांसमोर अधिकृतपणे शरणागती पत्करल्या वृत्त समोर आल्यामुळे त्याच्या मृत्यूच्या किंवा बेकायदेशीर अटकेच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Maoist Encounter : एक कोटींपेक्षा अधिकचा इनाम असलेला माओवादी लीडर गणेश उईकेसह सहा जण चकमकीत ठार! धर्मरावबाबांच्या अपहरणाचा मुख्य सुत्रधार...

देवजी (थिप्परी तिरुपती) हा १९९१ मध्ये झालेल्या माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अपहरणाच्या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचे मानले जाते. ७ एप्रिल १९९१ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माओद्यांनी डाॅ. धर्मरावबाबा आत्राम यांचे अपहरण केले होते.

माओवाद्यांनी आत्राम यांच्या सुटकेच्या बदल्यात तेव्हा चंद्रपूरच्या कारागृहात बंदिस्त असलेला त्यांचा प्रमुख नेता शिवण्णा याच्या सुटकेची मागणी केली होती. माओवाद्यांनी आत्राम यांना सुमारे १७ दिवस ताब्यात ठेवले होते. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी करून शिवण्णाची सुटका केली आणि त्यानंतर माओवाद्यांकडून आत्राम यांची सुटका झाली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.