उल्हासनगरात अंगावर धावणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे १० स्पॉट
esakal February 23, 2026 05:45 AM

उल्हासनगरात भटक्या श्वानांची दहशत
शहरातील १० डेंजर झोनची यादी जाहीर
दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २२ : शहरात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला असून, पायी चालणारे नागरिक आणि वाहनचालकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका कांता पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे प्रभाग १३ मधील श्वानांचा वावर असलेल्या १० हॉटस्पॉटची यादीच सादर केली आहे. या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नगरसेविका कांता पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की पहाटे रेल्वे स्टेशनला पायी जाणाऱ्या चाकरमान्यांना अंधारात कुत्र्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. अनेकदा स्वतःचा बचाव करताना लोक खाली पडून जखमी होत आहेत. तसेच सकाळी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या मागेही ही कुत्री लागत असल्याने पालकांमध्ये चिंता आहे. पवार यांनी प्रश्न उपस्थित केला, की जर एका प्रभागात १० स्पॉट असतील तर संपूर्ण शहरात ही समस्या किती भीषण असेल? या गंभीर समस्येबाबत पालिकेच्या सार्वजनिक वैद्यकीय आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’अंतर्गत निर्बीजीकरणाची मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच शहरात लवकरच ‘डॉग शेल्टर होम’ उभारण्याची तयारी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रुग्णालयांत रुग्णांचा ओघ वाढला
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव इतका वाढला आहे, की कॅम्प नंबर ३ मधील मध्यवर्ती रुग्णालय आणि कॅम्प नंबर ४ मधील शासकीय प्रसूतिगृह या दोन्ही ठिकाणी रेबीजची इंजेक्शने घेण्यासाठी दररोज नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. कुत्र्यांनी लचके तोडल्याच्या घटनांमुळे लोकांमध्ये दहशत आहे.

हे आहेत डेंजर स्पॉट''
१. शिवमार्ग, लालचक्की परिसर
२. लुम्बिनी बाग, संभाजी चौक
३. दुर्गानगर, संभाजी चौक
४. राहुलनगर, संभाजी चौक
५. सुभाष टेकडी
६. साईबाबानगर परिसर
७. आम्रपालीनगर परिसर
८. उत्कर्ष नगर (होली फॅमिली शाळा परिसर)
९. मेथडीस चर्च रोड
१०. सार्वजनिक मित्रमंडळ, लालचक्की परिसर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.