विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जागर
दहिवली येथे शिवसंस्कार जयंती महोत्सव उत्साहात
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण तालुक्यातील दहिवली गावामध्ये युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने शिवसंस्कार जयंती महोत्सव व संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या वेळी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, राष्ट्रनिर्मिती, विविधतेत एकता, संविधानातील मूल्ये अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी चित्रे साकारली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला, तर महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि होम मिनिस्टर या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विबग्योर फाउंडेशनचे श्रेयश अग्रवाल आणि शौर्य फाउंडेशनचे सोहम चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमात ‘संगीत शिवचरित्र’ अंतर्गत शिवव्याख्यान व पोवाडे सादर करण्यात आले.
अनिकेत दांडेकर व युवा संस्कार संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. तसेच स्टॅण्ड-अप कॉमेडियन उमेश उघडे व दिनेश सासे यांनी उपस्थितांना खळखळून हसवले. गडकिल्ले संवर्धनाविषयी माहितीपर सादरीकरण हर्षल कांबरी यांनी करून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान व जाणीव निर्माण केली.