चिपळूणमध्ये संत गाडगेबाबा यांची जयंती
आज परीट समाजाचा मेळावा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ : स्वच्छतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती आणि १३ वा जिल्हा परीट समाज स्नेह मेळावा २३ रोजी चिपळूण येथे उत्साहात साजरा होणार आहे. पेठमाप परीट आळी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात जिल्हाध्यक्ष सुभाष कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होईल.
चिपळूण येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९:४५ वाजता पेठमाप परीट आळी येथून प्रभात फेरी काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता महिला जिल्हाध्यक्षा सौ. अंजली पिंपळकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ पार पडेल. सकाळी ११ वाजता मुख्य जिल्हा मेळाव्याला सुरुवात होईल. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष वसंत पिंपळकर पुरस्कृत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा होईल. दुपारी १२:१५ वाजता पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. कचेश्वर राऊत व प्रा. विनायक होमकळस हे संत गाडगेबाबांच्या जीवनचरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. दुपारी १ वाजता कार्याध्यक्ष मनोज शिंदे आणि लाँड्री अध्यक्ष महेश भोसले यांच्या नियोजनाखाली लाँड्री व्यवसायातील आधुनिक मशीन्स, सोल्यूशन केमिकल्स आणि साडी रोल प्रेस यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत नाशिक, पुणे आणि कोल्हापूर येथील तज्ज्ञ कंपन्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यात विमल एजन्सीचे प्रा. मंदार गुरव यांचा सहभाग असेल. दुपारी १:३० वाजता विविध शाखांच्या अध्यक्षांचे मनोगत होईल.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सल्लागार आबा महाडिक, दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव नवनीत भोसले, युवक अध्यक्ष नितीन चाळके, रितेश महाडिक, वैशाली शिंदे, संदेश कदम, अमोल कदम व सर्व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत. या मेळाव्यास जिल्ह्यातील समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संत गाडगेबाबा परीट समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.