Children Sold For Money Miraj : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यापैकी एका मुलाची विक्री माधवनगरात तर दुसऱ्याची कर्नाटकात केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. तिसरी मुलगी विक्रीचे प्रयत्न सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. गंभीर बाब म्हणजे या विक्रीत महापालिकेच्या प्रसूती विभागातील महिला शिपाई सुरेखा चंद्रकांत लोंढे (रा. कोल्हापूर चाळ, मिरज), विकत घेणारा माधवनगरातील संजय दिलीप गोसावी (लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली), दशरथ तुकाराम लोंढे (रा. कोल्हापूर चाळ) यातील मध्यस्थी उमाजी गणेश लोंढे (रा. मिरज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरजेतील सुभाषनगर परिसरातील ही महिला कौटुंबिक समस्यांनी त्रस्त आहे. तिच्या लहानपणी आई-वडिलांचे निधन झाले होते. अनाथ झाल्यानंतर ती कचरा वेचक म्हणून काम करीत होती. रोहित नामक तरुणासोबत तिचा प्रेमविवाह झाला. त्यांना दोन मुलगे, एक मुलगी अशी तीन अपत्ये झाली. पती रोहित व्यसनी आहे. तो तिला सतत शिवीगाळ करून मारहाण करायचा.
मुलांचे संगोपन अवघड झाले होते. त्यातून तिने मुलांना विकण्याचा निर्णय घेतला. तिची प्रसूती मिरजेतील महापालिकेच्या दवाखान्यात झाली होती. तिथे दवाखान्यातील कर्मचारी सुरेखाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर सुरेखा आणि लोंढे यांनी २०२४ मध्ये तीन अपत्यांपैकी एका मुलाला कर्नाटकातदत्तक म्हणून विकले. त्यासाठीची दत्तक प्रक्रियाही बेकायदेशीर केली. त्याबदल्यात दोघांनी मुलांच्या आईला वीस हजार रुपये आणून दिले. त्यानंतर दुसऱ्या मुलालाही संशयितांनी माधवनगर येथील सचिन गोसावी याला विकले. त्याच्याकडूनही आणलेले वीस हजार रुपये त्यांनी दिले.
तिसऱ्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी संबंधित महिला काही दिवसांपूर्वी बालकल्याण समितीकडे आली. आधीच्या अनुभवातून इथेही आपल्याला त्याबद्दल पैसे मिळतील, अशी तिला आशा वाटली. तिने पैसे मागितल्याने बालकल्याण समितीच्या सदस्यांनी तिची सखोल चौकशी केली. त्यावेळी तिच्या बोलण्यात काही संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्या.
Jamkhandi–Miraj Highway Accident : आजारी आईला भेटायला जाताना काळाचा घाला; ट्रकने दुचाकीला उडविल्याने पती-पत्नीसह 9 वर्षांची मुलगी ठारबालकल्याण समिती अध्यक्ष व सदस्य निवेदिता ढाकणे, डॉ. कालिदास पाटील, आयेशा दानवाडे, दीपाली खैरमोडे यांनी याबाबत सखोल चौकशीचे निर्देश चाईल्ड लाईन संस्थेला दिले. चौकशीअंती संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. बालकल्याण समितीने याप्रकरणी सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बाल संरक्षण अधिकारी श्रीमती वाघमारे यांनी मिरजशहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक किरण चौगले अधिक तपास करीत आहेत.
चाईल्ड लाईनची कामगिरी
चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी शानूर दानवाडे, आरती निडसोसे, अश्विनी कुंभार यांनी या सर्व प्रकरणात पुढाकार घेत चौकशी केल्याने प्रकरण उघडकीस आले. त्यांना बालकल्याण समिती लेखनिक वैशाली कांबळे, समुपदेशक शुभांगी धुमाळ, अधीक्षक सुमन पाडवी, सुंदराबाई मालू मुलींचे बालगृहाच्या स्टाफने आवश्यक ते सहकार्य केले. महिला बालकल्याण समितच्या चौकशीमुळे तिसऱ्या मुलीची विक्री रोखली गेली. तूर्त तिला मिरजेतील पाठक अनाथालयात ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील ‘कारा’ एजन्सीद्वारेच नातेबाह्य बालकांची दत्तक प्रक्रिया पार पाडली जाते. परस्पर दत्तक प्रक्रिया बेकायदेशीर असून यात बाल न्याय (संरक्षण आणि काळजी) अधिनियम २०१५ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात.