Chipalun Monga Party : चिपळुणात 'मोंगा' ठरतोय रोजगाराचा आधार; पार्ट्यांना जोर, वाशिष्ठी काठी पावटे विक्रीतून महिलांना उत्पन्न
esakal February 25, 2026 06:45 AM

चिपळूण : कोकणात सध्या थंडीचा कडाका वाढत असतानाच ‘मोंगा पार्टी’ आणि त्यातून मिळणारा व्यवसाय यांचा एक घट्ट ऋणानुबंध निर्माण झाला आहे. थंडीमुळे मोंगा पार्ट्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, ही परंपरा आता केवळ चवीपुरती मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे.

मोंगासाठी प्रामुख्याने गावठी पावट्याची मोठी मागणी असते. यामुळे वाशिष्ठी नदीच्या किनारी असलेल्या अनेक गावांमधील महिलांना रोजगाराचे उत्तम साधन उपलब्ध झाले आहे. पहाटेपासूनच शेतातून पावटा काढणे, तो सोलणे आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देणे या प्रक्रियेत अनेक कुटुंबांचा सहभाग वाढला आहे.

Ratnagiri Logistics : हापूस, काजू, मत्स्य निर्यातीला नवे बळ; स्थानिक तपासणी सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

थंडी सुरू झाली की चिपळूण तालुक्यांमध्ये मोंगा पार्ट्यांची रेलचेल सुरू होते. थंडी, शेकोटी आणि मातीच्या मडक्यात शिजणारी आपल्या आवडीचा जिन्नस यांचा संगम म्हणजे मोंगा पार्टी. ही केवळ जेवणाची पद्धत नसून, ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आता व्यावसायिक स्वरूप धारण करणारी परंपरा बनली आहे.

शेतात मिळणाऱ्या ताज्या भाज्या-वालाच्या शेंगा, बटाटे, कांदे, रताळी, मक्याची कणसे, तसेच इतर आवडीच्या भाज्या आणि पनीर या सर्व घटकांना मसाल्यांमध्ये एकत्रित करणे म्हणजेच मोंगा. त्यात अंडीही टाकली जातात. यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतात सहज उपलब्ध होणारा भांबुर्डाचा पाला होय.

Sindhudurg Farmer : नोकरी नव्हे शेती! पाट गावातील शेतकऱ्यांनी कलिंगडातून घडवले आर्थिक स्वावलंबन

थंडीच्या रात्री शेकोटीभोवती बसून मित्र-परिवारासोबत गप्पा मारत मोंगा खाण्याची मजा काही औरच असते. आज अनेक शेतकरी, रिसॉर्टमालक, ढाबे आणि पर्यटन व्यावसायिक थंडीच्या हंगामात खास मोंगा पार्टीचे आयोजन करत आहेत.

साधारणपणे रिसॉर्ट आणि फार्महाऊस मालक एका व्यक्तीमागे मोंगा पार्टीसाठी ५०० ते ७०० रुपये आकारतात, तर थोड्याफार अधिक सुविधा असलेल्या फार्महाऊसमध्ये हा दर १ हजार रुपयांपर्यंत असतो. त्यामुळे थंडीच्या मोसमातील या मोंगा पार्टीमुळे साधारणपणे काही लाखांच्या घरात उलाढाल होते.

थंडीच्या दिवसांत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी अशा मोंगा पार्ट्यांना पसंती दिली जात आहे. यामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळत आहे. कमी भांडवलात केला जाणारा हा व्यवसाय थंडीच्या हंगामात चांगला नफा देऊन जातो.

अशी बनवतात पोपटी

एका मडक्यात तळाला भांबुर्डाच्या पाल्याचा थर त्यावर शेंगा पुन्हा पाला मग पनीर आणि इतर भाज्या असे एकावर एक असे तीन ते चार थर लावले जातात. सोबतीला जाडे मीठ आणि ओवा टाकला जातो. हे मडके भरल्यावर त्याचे तोंड पाल्याचा जाड थर आणि ओल्या मातीने बंद करून ते उपडे ठेवतात. त्याच्या आजूबाजूला पालापाचोळा आणि लाकडे रचून शेकोटी पेटवली जाते.

शेंगा विक्रीमध्ये महिलांचा सहभाग

गोवळकोट गावच्या प्रवेशद्वारावर जिथे मगर दर्शन पॉईंट आहे तेथे दहा ते पंधरा महिला वालाच्या शेंगांची विक्री करतात. एका महिलेकडे दहा ते पंधरा किलो वालाच्या शेंगा असतात. ८० १०० ते १२५ रुपये किलो दराने या शेंगांची विक्री होते आणि त्यातून महिलांना चांगले पैसे मिळतात.

मोंगा पार्टीमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट ग्राहक मिळतो. ताजी, सेंद्रिय आणि हंगामी उत्पादने ही मोंगा पार्टीची खास ओळख बनली आहे. मोंगासाठी खाडीकिनारी गावातील कडव्या वालाच्या, पावट्याच्या  शेंगांना मोठी मागणी असते. त्यांच्या चवीमुळे आणि स्थानिक ओळखीमुळे या शेंगांना अनेक जण पहिली पसंती देतात.

- मनोज गांधी, मंडल कृषी अधिकारी चिपळूण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.