मालमत्ताकर, पाणीपट्टी वसुलीसाठी कडक मोहीम
esakal February 26, 2026 01:45 AM

तळेगाव दाभाडे, ता. २५ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांवर जप्ती, सील व नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू झाली आहे.
ही मोहीम मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड आणि कर अधिकारी कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. नगरपरिषद हद्दीत एकूण ४१ हजार ८८२ मालमत्ताधारक आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर वसुलीचे ३८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी पाच कोटी रुपयांची प्रकरणे न्यायालयीन प्रकरणात अडकलेली आहेत. ३३ कोटी रुपये वसूल करण्यायोग्य आहेत. आतापर्यंत १३ कोटी ३२ लाख रुपये इतकी वसुली झाली आहे.
थकबाकी वसुलीसाठी १२ भाग लिपिक, ६ वॉरंट अधिकारी व ६ साहाय्यक कर्मचारी यांची पथके कार्यरत आहेत. थकबाकीदारांना जप्ती नोटिसा बजावणे, मालमत्ता सील करणे तसेच नळजोड खंडित करणे अशा कारवाया सुरू आहेत. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या नागरिकांना दोन टक्के दंडात्मक व्याज सवलत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

पाणीपट्टी वसुलीचा आढावा
पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ९ कोटी रुपये असून आतापर्यंत ३ कोटी २९ लाख रुपये जमा झाले आहेत. शहरात एकूण १८ हजार ३५९ नळजोड आहेत. थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून अनधिकृत नळजोड तोडण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, मालमत्ता कराचा डेटा महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा पोर्टल mahaulb.in वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पाणीपट्टीचा डेटा एन्ट्री मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर पाणीपट्टीचाही ऑनलाइन भरणा सुरू करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेकडून नागरिकांना थकबाकी लवकरात लवकर भरून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.