पुणे : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, Aircraft Accident Investigation Bureau म्हणजेच AAIB चे अधिकारी के. रामचंद्रन यांनी 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता हा ब्लॅक बॉक्स पोलीस ठाण्यात ठेवला होता. फक्त ब्लॅक बॉक्सच नाहीतर विमानाचे इतरही पार्ट पोलीस ठाण्यात ठेवले होते. आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता का हे मात्र समजू शकले नसले तरी यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर त्यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली जाऊ लागली. त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनी यावर व्हीएसआर कंपनीवर आरोप केले. त्याचसोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.
दरम्यान, अजित पवारांच्या अपघाती विमानाचा ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणांच्या हाती लागला. परंतु हा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं. त्यामुळे त्यावर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या.
विमानाचा ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी असतो, ती जागा म्हणजे विमानाचा भाग हा जळालेल्या अवस्थेत नव्हता. त्यामुळे त्यातील ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा संशयही व्यक्त करण्यात येऊ लागला. तसेच ब्लॅक बॉक्स जरी जळाला असला तरी त्यातील चीपच्या आधारे माहिती मिळू शकते असंही म्हटलं गेलं.
आता हा ब्लॅक बॉक्स बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता असं समोर आलं आहे. त्या संबंधित एक फोटो व्हायरल होत आहे. एका पॅकेजमध्ये हा ब्लॅक बॉक्स आणि विमानाचे इतर भाग ठेवण्यात आल्याचं समोर आलं. त्यावर Aircraft Accident Investigation Bureau म्हणजेच AAIB चा शिक्का असल्याचंही दिसतंय. परंतु पॅकेजमध्ये असलेला हा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत होता की चांगल्या अवस्थेत होता हे मात्र स्पष्ट होत नाही. परंतु बारामती पोलीस स्टेशनमधून व्हायरल झालेल्या या फोटोनंतर आता चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला. थातूरमातूर कारवाई करून चालढकल करण्याचा डीजीसीए प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेचा जनक्षोभ अजून वाढेल, या कारवाईने आम्ही समाधानी नाही. त्यामुळे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी अमोल मिटकरींनी केली. तसंच व्हीसीआर कंपनीवर कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे असंही मिटकरी म्हणाले.
ही बातमी वाचा: