महापे रोडवर भीषण अपघात
esakal February 26, 2026 06:45 AM

महापे रोडवर भीषण अपघात
दुचाकीवरील एकाचा मृत्यू, एक जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : महापे रोडवर एका भरधाव अवजड वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसमुल सुहेल अहमद खान असे मृत मुलाचे नाव आहे. अरमान जमाल अहमद खान (२०) हे जखमी झाले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटमना सोमवारी (ता. २३) सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अवजड वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्रा कौसा येथील अरमान खान असे जखमी दुचाकी चालकाचे नाव असून तो इलेक्ट्रीशियन म्हणून जुईनगर येथे काम करतो. सोमवारी सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास तो आपल्या मामाची दुचाकी घेऊन मुंब्र्यातील नातेवाईक तसमुल खान याला तुर्भे येथे कामावर सोडण्यासाठी निघाला होता. शिळफाटा ओलांडून महापे रोडवरील पेट्रोल पंपाजवळ येताच मागून एका भरधाव अवजड वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये तसमुल सुहेल अहमद खान यांचा मृत्यू झाला. तर जखमी तसमुल खान याला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात अनोळखी अवजड वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.