Nashik Plastic Ban : नाशिकमध्ये प्लॅस्टिक वापरणाऱ्यांना दणका! दोन वर्षांत ६३ लाखांचा दंड वसूल
esakal February 26, 2026 07:45 AM

नाशिक: शहरी भागामध्ये प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे नाशिक शहरात प्लॅस्टिक वापरा संदर्भात महापालिकेने केलेले कारवाई व प्लॅस्टिकचा वापर होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना विधिमंडळ सचिवालयाकडून प्राप्त झाल्या आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने वर्षभरात ४८५ केसच्या माध्यमातून २५ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

एप्रिल २०१८ पासून राज्यात प्लॅस्टिक बंदी आहे. ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर या नियमान्वये करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर विक्री व साठ्यावर बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने अशा प्रकारचे प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मोठ्या प्रमाणात कारवाई करून देखील प्लॅस्टिकची निर्मिती व विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने या संदर्भात शहरी भागात संशोधन केले. त्या अनुषंगाने आमदार सुधीर मुनगंटीवार व प्रवीण दटके यांनी महापालिकांकडून कारवाईचा अहवाल मागितला आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेच्या वतीने कारवाईचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

Rationalism and Social Progress : यश हे आपल्या परंपरेतून नव्हे तर आपल्या परिश्रमातून आणि कार्यातून मिळते.!

दोन वर्षांत एक हजार २३८ नागरिकांवर कारवाई

नाशिक महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ यादरम्यान ४८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २४ लाख ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ७५३ दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात ३८ लाख २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दोन वर्षांत एकूण एक हजार २३८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ६३ लाख १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.