मंचर, ता. २६ : शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वृद्धीचा नवा आदर्श निर्माण करत पुणे जिल्हा परिषद शाळांनी एसक्यूएएएफ (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा, शाळांमधील भौतिक व मूलभूत सुविधा तसेच कुशल मनुष्यबळ या विविध निकषांवर हे मानांकन देण्यात येते. या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंगवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरडेवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अवसरी बुद्रुक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे या शाळांनी ‘अ+’ श्रेणी मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.
याशिवाय राज्यस्तरीय मूल्यांकनात ४२९ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शेवाळवाडी (मंचर) येथील नालंदा इंग्लिश स्कूल तसेच महाविद्यालय विभागात मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय यांना ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. या यशामुळे आंबेगाव तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
शिक्षकांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण सहभागामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापनाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.