टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 मोहिमेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 76 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं. भारताला या पराभवामुळे मोठा फटका बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा भारताच्या नेट रनरेटवर परिणाम झाला. त्यामुळे सेमी फायनलच्या हिशोबाने भारताचं टेन्शन वाढलं. त्यामुळे भारतासाठी झिंबाब्वे विरुद्धचा सामना करो या मरो असा होता. भारताने गुरुवारी झिंबाब्वेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला.भारताने या विजयासह सेमी फायनलच्या शर्यतीतील आपलं आव्हान कायम ठेवलं. मात्र या विजयांनतर भारताची धाकधूक कायम आहे. भारत विरुद्ध झिंबाब्वे सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलचं चित्र काय आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने झिंबाब्वेसमोर 257 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकून नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्याची नामी संधी होती. मात्र भारतीय गोलंदाज झिंबाब्वेला ऑलआऊट करण्यात आणि मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले. झिंबाब्वेनेही फटकेबाजी करत 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. त्यामुळे भारताला फक्त 72 धावांनीच विजय मिळवता आला. त्यामुळे भारताला नेट रनरेटमध्ये काही खास फायदा झाला नाही. झिंबाब्वेचं या पराभवानंनतर आव्हान संपुष्टात आलं. तर भारताच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
टीम इंडिया या विजयानंतरही ए ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर विंडीज 2 सामन्यांमधील एका विजयानंतरही दुसऱ्या स्थानी कायम आहे. ए ग्रुपमधून उपांत्य फेरीतील एका जागेसाठी भारत आणि विंडीजमध्ये टफ फाईट आहे. आता भारत आणि विंडीज दोन्ही संघ सुपर 8 फेरीतील आपला शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे.
दक्षिण आफ्रिका या स्पर्धेतील दहाव्या पर्वात अजिंक्य आहेत. दक्षिण आफ्रिकेने साखळीनंतर सुपर 8 फेरीत खेळलेले 2 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया आणि विंडीजला पराभूत केलंय. दक्षिण आफ्रिका 2 सामन्यानंतर 4 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. विंडीज टीम इंडियाप्रमाणे 2 गुण असूनही फक्त नेट रनरेट चांगला असल्याने दुसर्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ तिसऱ्या तर झिंबाब्वे चौथ्या स्थानी आहे.