'...म्हणून मी कधीही भाषण केलं नाही, वहिनींना, पार्थला, जयला वाटत होतं', सुनील तटकरेंनी सांगितला विधानसभा निवडणुकीवेळचा तो किस्सा
अंकिता खाणे February 27, 2026 12:13 PM

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठी फेरबदल करण्यात आले असून सुनेत्रा पवार यांच्याकडे आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल (गुरूवारी, ता २६) वरळी डोम येथील सभागृहात पार पडली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी जाहीर केले. यावेळी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी देखील भाषण केलं. या भाषणात त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी निवडणुकीवेळी झालेल्या जनसन्मान यात्रेच्या सभामध्ये ते भाषण का करत नव्हते, याचंही कारण त्यांनी सांगितलं आहे. 

माझी इच्छा होती की मी बारामतीत भाषण करावं

सुनील तटकरे (Sunil Tatkare) भाषणावेळी म्हणाले की, जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळेजण राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो. मी असा एक अध्यक्ष निघालो की दादांनी पूर्णवेळ बोललं पाहिजे, म्हणून मी कधीही भाषण केलं नाही. जनसन्मान यात्रेमध्ये बघा मी एकही भाषण केलं नाही. माझी इच्छा होती की मी बारामतीत भाषण करावं, वहिनींनाही वाटत होतं, पार्थला, जयला वाटत होतं. पण आम्ही बारामती मधून दादांची निघालेली अभूतपूर्व मिरवणूक सर्वांनी पाहिली. वहिनी दादांची निघालेली बारामतीतील अभूतपूर्व मिरवणूक म्हणजे त्यांनी दोन गाड्या बदलल्या, त्या दोन गाड्यांच्या काचा लोकांकडून फुटल्या होत्या, इतकं दादांच्या मिरवणुकीमध्ये मोठं स्वागत त्यावेळेला झालं होतं. विधानसभेची निवडणुकीच्या पूर्व संधीची बाब मी सांगतोय, असंही पुढे तटकरेंनी म्हटलं आहे.

निखळपणाने काम करणारे नेतृत्व बारामतीकरांनी स्वीकारलं. राज्यभरामध्ये त्यांना प्रतिसाद मिळाला म्हणून 59 पैकी 41 जागांवरती गुलाल उधळण्यात आपल्या सगळ्यांना यश मिळालं. आपल्या यशापेक्षा दादांची दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड क्षमता, लोकांपर्यंत समाजकार्य करण्याची त्यांची हातोटी, याच्यातून चांद्यापासून बांध्यापर्यंत जाण्यात आपल्याला यश मिळालं, असं म्हणत सुनील तटकरे यांनी अजित पवारांसोबत च्या आठवणींना उजाळा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय (NCP) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदना आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. आपल्या सर्वांचे लाडके नेते अजित दादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी झाली असून ती भरून निघण्यासारख नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पहिलंच भाषण केलं. यावेळी, त्यांचा कंठ दाटला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे  जाणार असल्याचे स्पष्ट केले. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.