Rajya Sabha Election 2026 Sharad Pawar: राज्यसभेवर पुन्हा जाणार का, याबाबत भूमिका स्पष्ट न करता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निर्णयाचा चेंडू महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कोर्टात टाकला आहे. काल रात्री पवार यांच्यासोबत जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात राज्यसभा निवडणुकीवर (Rajya Sabha Election 2026) चर्चा झाली. मात्र, पवारांनी स्वतःची भूमिका जाहीर न करता मविआच्या नेत्यांशी संवाद साधण्याचा सल्ला दिल्याचे समजते.
यंदा देशभरातील 37 राज्यसभा जागा रिक्त होत असून, त्यापैकी 7 जागा महाराष्ट्रातील आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला 6 जागा सहज जिंकता येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिली आणि समन्वय साधला तर त्यांना 1 जागा मिळू शकते. शरद पवारांसह फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी आणि रजनी पाटील यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे. 16 मार्चला निवडणूक होणार आहे.
सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत हालचाली सुरू केल्या असून मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा अपेक्षित आहे. तसेच जयंत पाटील व शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे समजते. दरम्यान, काँग्रेसने राज्यसभेची जागा स्वतःकडे ठेवून मे महिन्यात रिक्त होणारी विधान परिषद जागा शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव ठाकरेंसमोर ठेवला आहे. ठाकरेंची परिषदेची मुदत संपत असल्याने ते स्वतः पुन्हा जाणार की इतरांना संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांमुळे काँग्रेस गोटात संभ्रम आहे. पवार मविआकडून राज्यसभेवर गेले आणि पुढे विलिनीकरण झाले, तर जागेचे गणित बिघडू शकते, अशी चर्चा आहे.
पवारांच्या सर्वपक्षीय संबंधांमुळे आणि ज्येष्ठतेमुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करत असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पवार दोनदा राज्यसभेवर गेले असून दोन्ही वेळा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या 59 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत ते एकही निवडणूक हरलेले नाहीत. मात्र, ते रिंगणात नसतील तर महायुती सातवा उमेदवार देत राजकीय डाव साधू शकते. 2022 मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रॉस व्होटिंग आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर अतिरिक्त उमेदवार निवडून आणले होते. तसाच खेळ पुन्हा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत शरद पवार रिंगणात उतरणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीला विश्रांती मिळावी म्हणून त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आणखी वाचा