कोल्हापूर : शहरातील कमळांच्या वेली असलेल्या तलावांची संख्या कमी झाली असून, जलतीर्थ स्वच्छता मोहिमेनिमित्ताने रंकाळा परिसरात ‘कमळ उद्यान’ साकारण्यात येत असल्याची घोषणा महापौर रूपाराणी निकम यांनी केली.
रंकाळा तलावावरील राजर्षी शाहू उद्यानाजवळील पाण्यात विविध प्रकारच्या कमळांच्या वेली त्यांच्या हस्ते सोडण्यात आल्या. कोल्हापूर म्हणजे तलावांचे शहर अशी जुनी ओळख आहे. बहुतांश तलाव विविध प्रकारच्या कमळांच्या वेलींनी व्यापलेले असायचे.
करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे आवडते फूल कमळ असल्याने व येथे कमळ असलेल्या तलावांची संख्या भरपूर असल्याने कोल्हापूर हे नाव पडले असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर ‘जलतीर्थ स्वच्छता’ या मोहिमेत विविध ठिकाणचे तलाव, विहिरी, जलस्रोतांची स्वच्छता घेण्यात आली.
त्यावेळी रंकाळा तलावाच्या दक्षिणेकडील राजर्षी शाहू उद्यानालगतच्या परिसरातील एका भागात कमळ उद्यान साकारण्यास सुरुवात केली. यावेळी आयुक्त के. मंजुलक्ष्मी, ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे सरव्यवस्थापक (वितरण) रवींद्र रायकर, सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा, नगरसेविका माधुरी व्हटकर, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, अमरजा निंबाळकर, उपायुक्त परितोष कंकाळ, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, कोल्हापूर अर्थ वॉरियर्सचे अभिजित कुलकर्णी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महापौर निकम म्हणाल्या, ‘पूर्वीच्या तलावांमध्ये कमळांच्या फुलांप्रमाणे रंकाळ्याजवळील या भागात कमळ उद्यान साकारून या परिसरात पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण निर्माण करूया. भविष्यात हे ठिकाण आणखी सुंदर करूया.
राजर्षी शाहू महाराजांनी साकारलेल्या पाणी योजनेतील कमानीवरील पाण्याच्या पाटाची प्रतिकृती येथे उभी केली आहे. कमळ ही कोल्हापूरची वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असून, त्याची ठिकाणे विकसित करावी, अशी सूचना शहराच्या जैवविविधता समितीने महापालिकेकडे केली होती.
त्यानुसार जलसंपदा विभागाच्या जागेशेजारील पदपथाने जो रंकाळा तलावाचा भाग वेगळा झाला आहे, त्या तलावात हे उद्यान विकसित करण्याचे प्रस्तावित होते. त्याप्रमाणे सुरुवात केली असून, तिथे विविध प्रकारच्या कमळांचे वेल रूजवण्यात येणार आहेत.’