Latur Crime: बदनामी करून मागितली पन्नास लाखांची खंडणी
esakal February 28, 2026 07:45 PM

जाफराबाद : सोशल मीडियावर ‘तुमची मालमत्ता बेकायदेशीर आहे’, अशा आशयाची पोस्ट टाकून जाफराबादच्या नगराध्यक्षा कविता वाकडे यांच्या कुटुंबाची बदनामी केली. तसेच संबंधित मालमत्ता वाचवण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध जाफराबाद पोलिसांनी बुधवारी (ता.२५) गुन्हा दाखल केला आहे.

दीपक बाबूराव वाकडे यांनी तक्रारीत म्हटले की, जाफराबाद येथील ३२ एकर वडिलोपार्जित जमीन हडपण्याच्या किंवा त्यातून पैसे उकळण्याच्या उद्देशाने आरोपी प्रवीण सुभाष पिंपळे (रा. सोनगिरी) याने ७ जानेवारी १९७९ चे एक बनावट पत्र तयार केले. विशेष म्हणजे, १९७९ मध्ये संगणकाचा वापर नसतानाही हे पत्र संगणकीय ''फॉन्ट''मध्ये टाइप केलेले होते.

तक्रारदार वाकडे यांच्या पत्नी जाफराबाद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आहेत. आरोपी प्रवीण पिंपळे याने अशाच प्रकारे खोटी कागदपत्रे तयार करून इतर ८ ते १० लोकांनादेखील आपल्या जाळ्यात अडकवले आहे.

खोटी कागदपत्रे सादर करून लोकांकडून खंडणी वसूल करण्याचा त्याचा मोठा कट असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. आरोपीने केवळ तक्रारदाराचीच नाही, तर विभागीय आयुक्त कार्यालय (छत्रपती संभाजीनगर) आणि तहसील कार्यालयाचीदेखील बनावट शिक्के मारून फसवणूक केली आहे.

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजधर पठाडे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या गुन्ह्यात आरोपीला मदत करणारे इतर ''मास्टरमाइंड'' कोण आहे, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.