Jugadu Caps Business Story : एका उंदराने टोप्या विकून कमावली राजापेक्षा जास्त संपत्ती; 'जुगाडू कॅप्स'चा नेमका गेम प्लॅन काय?
esakal March 01, 2026 05:45 PM

सारिका चाटुफळे-कुलकर्णी- sarikachatuphale.kulkarni@gmail.com

कर्तारसिंग हा उंदीर नुकताच वाणिज्य शाखेचा पदवीधर होऊन महाविद्यालयातून बाहेर पडला होता. खरे तर वाणिज्य शाखेत काहीच भविष्य नाही, असे त्याला त्याचे आई-बाबा कितीतरी वेळा सांगत असत. पण कर्तारसिंगला विज्ञान आणि कला या शाखांमध्ये शिक्षण घेण्यात अजिबात स्वारस्य नव्हते. त्यातल्या त्यात वाणिज्य शाखेत जरातरी काही मिळेल, तिथून बाहेर पडल्यावर कुठला तरी धंदा चालू करावा आणि तुफान पैसे कमवावेत असे त्याला वाटत होते. आता न ऐकता वाणिज्य शाखेत गेलाच आहे तर किमान त्याने सीए वगैरे तरी व्हावे असे आई-बाबा म्हणत असत. पण त्याने ऐकले नाही.

कुठलातरी व्यवसाय करावा हे कर्तारसिंगच्या डोक्यात पक्के होते. हल्ली कशाची चलती आहे, येणाऱ्या काळात कुठले व्यवसाय उत्तम चालू शकतात याचा अभ्यास त्याने केला. मित्रांशी चर्चा केली. काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. आपल्या भारतात त्याची परिषद देखील भरलेली होती. तर तू त्या संदर्भात काही व्यवसाय करता येतो का ते बघ. काही मित्रांनी त्याला एखादा रोबोट तयार करता येतो का ते बघ असाही सल्ला दिला. पण उंदीर सरळ म्हणाला, ‘‘रोबोट तयार करायला मी काय गलगोटीया विद्यापीठाचा विद्यार्थी थोडीच आहे.’’

खूप दिवस विचार केल्यावर कर्तारसिंगच्या असे लक्षात आले की स्वतः काहीही नवीन उत्पादन तयार करणे म्हणजे त्यात प्रचंड वेळ घालवणे आणि भांडवलदेखील घालवणे हे क्रमप्राप्त आहे. त्याऐवजी चार दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून वस्तू गोळा कराव्यात आणि त्या जोडून आपले उत्पादन म्हणून विकावे. यासाठी फारसा वेळही जाणार नाही.

त्यासाठी तो भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरला. आणि त्याच्या लक्षात आले की भारतातील लोकांना टोप्या घालणे फार म्हणजे फार आवडते. स्वतःला तर ते टोपी घालतातच पण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून इतरांना टोपी घालणे हादेखील भारतीय माणसाच्या संस्कृतीचा भाग आहे. शिवाय उगीचच एकमेकांना टोप्या घालणेसुद्धा इथल्या लोकांना आवडते. मग टोप्या तयार करण्याचा कारखाना चालू केला तर? स्वतःच्याच कल्पनेने तो खूष झाला.

टोप्या तयार करणाऱ्या कंपनीचे नाव ठरले ‘जुगाडू कॅप्स’. स्वस्तात मिळेल म्हणून टोप्या तयार करण्यासाठी त्याने बांगलादेशी कापड मागवले. पण भारतात हल्ली बांगलादेशी घुसखोर खूप आलेले आहेत. जनक्षोभ टाळण्यासाठी त्याने ते कापड मँचेस्टरहून मागवले आहे असे सांगितले.

भारतातील धोबीघाट खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अशाच एका धोबीघाटावरील ड्रायक्लिनर्सबरोबर ‘जुगाडू कॅप्स’ने टायअप केले. सगळे कापड आता धोबीघाटावरून धुवून येऊ लागले. कर्तारसिंगने लंडनच्या एका मोठ्या कंपनीतील टेलर फोडला आणि त्याला भारतात टोप्या शिवण्यासाठी पाचारण केले गेले. आहे त्या पगारापेक्षा दुप्पट पगारावर ही नोकरी त्याला देण्यात आली. पण हुबेहूब लंडन आणि इटालीसारख्या टोप्या शिवल्या गेल्या पाहिजेत अशी अट त्याला घातली गेली.

भराभर टोप्या शिवण्याचे काम झाले. अमेरिकेकडून त्या टोप्यांना सुशोभित करून घेतले.

आता या टोप्या सगळ्यात आधी तर भारतातच खपतील याची कर्तार उंदराला खात्री होती. पण त्यासाठी या टोपीविषयी काहीतरी समज, अपसमज, नरेटिव्ह असे सगळीकडे पसरणे आवश्यक होते. एकदा या टोपीबद्दल बऱ्या वाईट चर्चा चालू झाल्या की मग त्याच्या व्यवसायाला काही वर्षे तरी मरण नाही हे तो जाणून होता.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र पाच वर्षांत घेणार ‘अर्थभरारी’; जग मंदावले... पण राज्याची प्रगती सुसाट

कर्तारने स्वतः टोपी डोक्यावर चढवली आणि तो रस्त्यारस्त्यातून फिरू लागला. त्याने बघितले की देशातील सगळीच जनता राजकारणावर चर्चा करण्यात प्रचंड वेळ घालवते आहे. म्हणजे आपल्या टोप्या खपवायच्या असतील तर आपल्याला काहीतरी खळबळजनक करणे गरजेचे आहे. त्याने पंजाबी ढोल आपल्या गळ्यात अडकवला, डोक्यावर ‘जुगाडू कॅप्स’ची रंगीबेरंगी टोपी चढवली आणि गाऊ लागला. ढूम ढुम ढुमाक, माझी टोपी जगात सुंदर.’ पण त्याच्याकडे फार कोणी लक्ष दिले नाही. आता काय करावे, त्याची ट्यूब एकदम पेटली. कोणाशी तरी तुलना केल्याशिवाय आपली टोपी चांगली यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. तो गाऊ लागला, ‘ ढूम ढूम ढुमाक, ढूम ढूम ढुमाक. राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान.’

आता गावातील लोक त्याला हसू लागले. पण राजाच्या टोपीपेक्षा छान टोपी आहे असा एक मूर्ख उंदीर म्हणतो आहे तर अशी टोपी आहे तरी कशी म्हणून काही लोकांनी टोप्या विकत घेतल्या. आता राजापेक्षा आपली टोपी चांगली या भावनेने लोक स्वतः ती टोपी घालू लागले. ‘मॅचेस्टरचा कपडा आहे, लंडनच्या टेलरने टोपी शिवली आहे,’ असे म्हणून त्या टोपीचे महत्त्व सांगू लागले.

काही लोक मात्र उंदराला हसत होते. ‘वेडा रे वेडा’ म्हणत त्याला हिणवत होते. पण बघता बघता उंदराचा व्यवसाय भरभराटीस आला. एकवेळ अशी आली की आता राजाच्या नेटवर्थपेक्षा उंदराची नेटवर्थ जास्त आहे असे टाइम मॅगेझिनने छापले. ही बातमी राजापर्यंत पोहोचली.

हा कोण छोटा प्राणी माझा प्रतिस्पर्धी म्हणून राज्यात उभा राहिला आहे. आणि मला त्याच्याबद्दल काही ठाऊकदेखील नाही! राजाने तत्काळ उंदराला पकडून आणण्याची आज्ञा केली. टाइम्स मॅगझिनमध्ये कर्तारसिंगचे नाव आल्याने तो आता एकदम हिरो झालेला होता. राजाचे लोक त्याला पकडण्यासाठी आले तेव्हा तो भारतीय बातम्यांच्या वाहिन्यांना मुलाखत देण्यात आणि व्यवसाय कसा करावा यावर भाषणे देण्यात व्यग्र होता. राजाच्या सैनिकांनी आधी कर्तारसिंगबरोबर एक एक सेल्फी काढून घेतला आणि मग त्या उंदराला पकडून दरबारात हजर केले गेले.

कर्तारसिंग कुठला व्यवसाय करतो हे राजाने जाणून घेतले. राजाने त्याला त्याच्या व्यवसायात भागीदारी मागितली. ‘राजापेक्षा माझी टोपी छान,’ अशी टॅगलाइन त्याने टोप्या विकण्यासाठी वापरलेली असल्याने त्यात राजाची प्रतिमा डागाळली आहे असा राजातर्फे दावा करण्यात आला. कर्तारसिंगने हे सगळे दावे फेटाळून लावले. आणि भागीदारी देण्यास नकार दिला. राजा चिडला. त्यामुळे त्याने आता ती टॅगलाइन बदलण्याची अट उंदराला घातलेली आहे. अथवा त्याला राज्यातून हाकलून देण्यात येईल असेही सांगितले आहे. उंदराने टॅगलाइन बदललेली आहे. जुगाडू कॅप्सची नवीन टॅगलाईन आता अशी आहे, ढूम ढूम ढुमाक. ढूम ढूम ढुमाक. राजाने सांगितल्यामुळे टॅगलाइन अशी असेल की आमची टोपी राजापेक्षा छान नाही.’

मी ऐकले आहे की टॅगलाइन बदलल्यापासून जुगाडू कॅप्सचा धंदा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

तात्पर्य ः आपण आपली वेगळी टोपी शिवून घ्यावी. कोणाकडून विकत घेऊच नये.

लेखिका ः टोपी न वापरणारी एक नागरिक.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.