IND vs AUS: टीम इंडियाने 'गार्ड ऑफ ऑनर' दिला, पण शेवटच्या ODI मध्येही एलिसा हेली भारताला नडली अन् दीडशतक ठोकलं; पाहा Video
esakal March 01, 2026 06:45 PM

Alyssa Healy receiving Guard of Honour from Indian players: भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या वनडे मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (१ मार्च) होबार्ट येथे होत आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार एलिसा हेलीसाठी (Alyssa Healy) अत्यंत भावनिक सामना आहे. तिचा हा कारकिर्दीतील अखेरचा वनडे सामना आहे.

तिने यापूर्वीच जाहीरे केले होते की भारताविरुद्ध या वनडे मालिकेनंतर होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यानंतर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त (Retirement) होणार आहे. त्यामुळे होबार्टला होत असलेला वनडे सामना तिच्या कारकिर्दीतील अखेरचा वनडे सामना (Last ODI Match) ठरला. पण या सामन्यातही तिने भारतीय संघाला चांगलेच सतावले होते.

AUS vs IND: टी२० नंतर आता वनडे मालिका जिंकण्याचा निर्धार, आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ODI मालिकेला सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून कर्णधार हेली आणि फोबी लिचफिल्ड मैदानात उतरल्या.

यावेळी हेली वनडेत अखेरची खेळी करण्यासाठी मैदानात उतरत असल्याने तिला भारतीय संघाकडून गार्ड ऑफ ऑनरही (Guard of Honour) देण्यात आला. तिने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत.

दरम्यान, फलंदाजीला आल्यापासून तिने स्फोटक फलंदाजी केली. लिचफिल्ड १४ धावांवर बाद झाली. पण नंतर जॉर्जिया वॉल आणि बेथ मुनी यांनी हेलीला भक्कम साथ दिली. हेलीने आक्रमक खेळताना अवघ्या ७९ चेंडूतच शतक साजरे केले. त्यानंतरही तिने तिची आक्रमक फटकेबाजी कायम केली. तिने दीडशतकही पूर्ण केले.

विशेष म्हणजे हेली शेवटच्या वनडेत शतक करणारी दुसरीच महिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी असा विक्रम केवळ दक्षिण आफ्रिकेच्या जोहमारी लॉटेनबर्ग यांनी केला होता. तसेच हे तिचे भारताविरूद्धचे तिसरे वनडे शतक आहे. ती भारताविरुद्ध ३ वनडे शतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

या सामन्यासाठी हेलीचा पती आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही स्टेडियममध्ये उपस्थित होता.

हेलीने या सामन्यात जॉर्जिया वॉलसोबत १०४ धावांची आणि बेथ मुनीसोबत १४५ धावांची भागीदारी केली. अखेर तिला ३७ व्या षटकात स्नेह राणाने त्रिफळाचीत केले. तिने ९८ चेंडूत १५८ धावांची खेळी केली, या खेळीत २७ चौकार आणि २ षटकार मारले. जॉर्जिया वॉलने ६२ धावांची खेळी केली.

तसेच नंतर बेथ मुनीनेही तिचे शतक पूर्ण केले. तिने ८४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह नाबाद १०६ धावा केल्या. ऍनाबेल सदरलँड्सने २३ धावांची खेळी केली. पण बाकी कोणी खास काही करू शकले नाहीत. पण हेली आणि मुनी यांच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने ४०० धावा पार केल्या. ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ७ बाद ४०९ धावा केल्या.

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

भारताकडून श्री चरणी आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. रेणुका ठाकूर, काशवी गौतम आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेता आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.