शैलेश नागवेकर
भारतीय संघाचा प्रत्येकी एक सामना सर्व नियोजित शहरांना मिळेल असा कार्यक्रम तयार केला जातो. म्हणून पर्यटनाचा हा घाट. यावेळी हे पर्यटन जास्त नजरेत भरते, त्याचे कारण महिनाभराची स्पर्धा आणि त्यात २० संघांचा सहभाग, त्यामुळे दिवसाला तीन-तीन गट साखळी सामने खेळवावे लागले. परिणामी एक सामना संपला की दुसऱ्या दिवशी बॅग उचलून निघण्याची तयारी करावी लागली.
क्रिकेट हा केवळ खेळ राहिलेला नाही, तो कधीच व्यवसाय झालाय, हे आता नव्याने सांगायची गरज नाही. द्विपक्षीय मालिका सोडाच... पण आयसीसीच्या जागतिक स्पर्धांतही मोठी उलाढाल होत असते. कोणाचीही का असो ना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पैसा भांडवली बाजारात येत असतो. हे चांगलेच आहे, पैसा खेळता राहिला पाहिजे तरच पर्यायाने अर्थकारणाचे चक्र फिरत रहाते. प्रक्षेपण हक्कांपासून मीडिया राइट्स), हॉटेलिंग, ट्रॅव्हलिंग, विविध सेवा, जाहीरातबाजी, मार्केटिंग यांच्यापासून स्टेडियममध्ये पिझ्झा-बर्गर आणि चढ्या भावात पाणी विक्रेते तसेच स्टेडियमच्या बाहेर मंडप बाधणारे क्राँट्रेक्टर आणि त्यांचे कर्मचारीही यांनाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. एकीकडे हे सर्व चांगले घडत असताना दुसरीकडे खेळाडूंना आणि प्रामुख्याने भारतीयांना प्रवासाचे द्राविडी प्राणायाम करायला लागते. ‘बॅग भरो और निकल पडो’ या टॅग लाइननुसार त्यांच्या पायाला प्रवासाचे चक्र लावलेले असते. मायदेशात स्पर्धा असली की सर्वसाधारपणे यजमान संघाला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे.
संघासाठी फायदेशीर असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त सामने खेळायला मिळेल, अशी रचना होते असे सर्वसाधारण होत असेल असा अंदाज. पण मायदेशात स्पर्धा आणि सर्वात जास्त प्रवास यजमानांचाच हे गणित पचनी पडत नाही. देशात सध्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे. पण सुपर-८ च्या पहिल्या दोन सामन्यापर्यंत सर्वात जास्त प्रवास करणारा संघ ठरलाय तो भारतीय संघ. ७ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा सुरू झाली आणि १५ दिवसांत भारतीय संघाने उपलब्ध माहितीनुसार मुंबई ते चेन्नई व्हाया मध्ये अनेक शहरे असा मिळून जवळपास ११ हजार किलो मीटरचा प्रवास केलाय. या दरम्यान ते अहमदाबादच्या एकाच मैदानावर दोन सामने खेळले. मुंबई, दिल्ली, कोलंबो, अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकता असा गटसाखळी आणि सुपर-८ असे मिळून सहा सामन्यांसाठी प्रवास केलाय. दुसरीकडे सर्वांत कमी प्रवास पाकिस्तान संघाने १५४ किलो मीटरचा केलाय. त्याला कारणही वेगळे आहे. त्यांचे सामने केवळ कोलंबो शहरातच नियोजित आहेत. पण भारतानंतर वेस्ट इंडीजचा अपवाद केला तर इतर संघांचा सरासरी प्रवास हा पाच हजार किलोमीटरपर्यंत राहिला आहे.
मायदेशातच आपल्या संघाचे हे क्रिकेट पर्यटन काही नवे नाही. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतही असेच घडले होते. त्याअगोदर २०११ मधील विश्वकरंडक स्पर्धेचा अनुभव काही वेगळा नव्हता. फरक एवढाच आहे. यावेळी लगेचच एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागत आहे आणि असा प्रवास मानसिकदृष्ट्या थकवणारा असतो. मुंबई ते दिल्ली विमानाने फार अंतर नाही पण विमानाच्या प्रत्यक्ष अंतरापेक्षा विमानतळावर एक-दोन तास अगोदर पोहोचणे नंतर बाहेर पडणे आणि तेथून हॉटेलमध्ये जाण यासाठी काही तास खर्च करावे लागतातच. सकाळी सुरु केलेल्या प्रवासासाठी दुपार होतेच आणि नंतर विश्रांती म्हणजे देशातल्या देशात फिरत असला तरी त्या दिवशी सराव होत नसतो. पण सरावाचे महत्त्व तेव्हा सर्वाधिक असते जेव्हा अभिषेक शर्मासारखा फलंदाज तीन वेळा शून्यावर बाद होतो. हळुवार चेंडू खेळताना त्रेधातिरपीट उडते अशा वेळी प्रत्येक तास सरावासाठी महत्त्वाचा असतो.
Premium| Climate warning: मानवी हस्तक्षेपाला हवा लगामआता दुसरे उदाहरण पाहुया. दक्षिण आफ्रिकेचा संघ गटसाखळी आणि सुपर-८ मिळून सातपैकी पाच सामने अहमदाबादमध्येच खेळला. थोडक्यात काय, तर अहमदाबादमध्ये भारतीय संघ सुपर-८ सामन्यासाठी जणू काही पाहुणा संघ म्हणून गेला आफ्रिकेविरुद्ध खेळल्यानंतर तेथूनच चेन्नईला निघालाही, पण दक्षिण आफ्रिकेचा संघ अगोदरपासून तेथेच होता आणि भारताविरुद्धचा सामना झाल्यानंतरही वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीसाठी तेथेच राहिला. वेस्ट इंडीजचा संघ मुंबईतील वानखेडेवर स्टेडियमवर दोन तर कोलकतामधील ईडन गार्डनवर तीन सामने खेळला. नेपाळ संघासाठी तर मुंबई त्यांचे दुसरे घर झाली होती. कारण त्यांचे चारही साखळी सामने मुंबईतच नियोजित होते.
आता यजमानांचेच स्वतःच्या देशातले असे पर्यटन हे योग्य की अयोग्य हा चर्चेचा दुसरा विषय आहे. आयसीसीकडून यजमानपद दिले जात असताना ठिकाणांचीही मर्यादा घालती जात असते. पण काही शहरांना झुकते माप मिळते हे उघड सत्य आहे. मात्र भारतीय संघाचा प्रत्येकी एक सामना सर्व नियोजित शहरांना मिळेल असा कार्यक्रम तयार केला जातो. म्हणून पर्यटनाचा हा घाट. यावेळी हे पर्यटन जास्त नजरेत भरते त्याचे कारण महिनाभराची स्पर्धा आणि त्यात २० संघांचा सहभाग त्यामुळे दिवसाला तीन-तीन गट साखळी सामने खेळवावे लागेल परिणामी एक सामना संपला की दुसऱ्या दिवशी बॅग उचलून निघण्याची तयारी करावी लागली.
आपला देश मोठा आहे आणि प्रत्येक शहराची वेगवेगळी संस्कृती आणि भाषा तसेच हवामानही विभागांप्रमाणे वेगवेगळे आहे. हे त्रिवार सत्य आहे. वानखेडे स्टेडियमवर लाल मातीची खेळपट्टी तर फार दूर नसलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काळ्या मातीची खेळपट्टी. यात ॲडजेस्ट करणे सोप नाही. आठवतंय ना...२०२३ मधील विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडेवरील उपांत्य सामन्यात साडेतीनशे धावा करणाऱ्या भारतीय संघाला दोन-तीन दिवसांत अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळताना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर अडीचशे धावा करताना कठीण झाले होते. आत्ताच उदाहरण सांगायचे तर दक्षिण आफ्रिकेचा संघ सुरुवातीपासूनच अहमदाबादमध्ये आहे. काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळलेय त्यामुळे भारतीयांसाठी त्यांनी बरोबर हळूवार चेंडूंचा सापळा लावला. अर्थात असे होणे याचा विचार भारतीयांनी केला नव्हता की सराव कमी पडला किंवा फाजील आत्मविश्वास होता ? हे तेच जाणो.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या टी-२० विश्वकरंडक आणि पाकिस्तान यजमान असले तरी स्वतःचे सामने अमिरातीमध्ये खेळलेल्या भारताने २०२३ मधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतपद मिळवले होते. त्यावेळी असे पर्यटन करावे लागले नव्हते हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आता व्हायचे ते घडून गेले आहे. परिस्थिती कशीही असो कामगिरी उंचावणे हाच त्यावरचा मार्ग आहे.