Kolhapur Sports : पश्चिम महाराष्ट्रात क्रिकेटचे बदलते अर्थकारण; टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ः सामन्यांत लाखोंची कमाई; व्यावसायिक स्पर्धांचा ट्रेंड
esakal March 02, 2026 08:45 PM

सचिन भोसले

कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात सध्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा अक्षरशः महोत्सव रंगला आहे. गावोगावी लाखोंची बक्षिसे जाहीर होत असून, या स्पर्धांमुळे स्थानिक अर्थकारणाला मोठी चालना मिळत आहे.

व्यावसायिक ‘आयकॉन’ खेळाडूंना सामनागणिक हजारो ते लाखो रुपयांचे मानधन दिले जात आहे. आयोजक, पंच, स्कोरर, मैदान व्यवस्थापन यांच्यामुळे क्रिकेटचे हे ग्रामीण अर्थचक्र अधिक गतिमान झाले आहे. लेदर बॉलपेक्षा झटपट रंगणारे सामने प्रेक्षकांनाही आकर्षित करीत आहेत.

Premium|Generation Z : जेनझीकरण..! पण.. जेन झी लोकं हा लेख वाचतील का? वाचणं हा त्यांचा स्थायीभाव आहे का?

या अर्थकारणात आयोजक, पंच, स्कोरर, मैदान व्यवस्थापन आणि क्रिकेटपटू ‘आयकॉन’ म्हणून या व्यवस्थेतील एक भाग आहेत. लेदर बॉल क्रिकेटपेक्षा टेनिस बॉल क्रिकेट झटपटच्या दुनियेत प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे.

यात कोल्हापूरच्या खेळाडूंमध्येही व्यावसायिकता आली आहे. मात्र, शहरापेक्षा ग्रामीण भागात अगदी सामनागणिक तीन ते १० हजार, तर बाहेर गेल्यास लाखातही मानधन घेण्यात ही मंडळी आघाडीवर आहेत.

AI in Sports : खेळाडू, प्रशिक्षकांनी धरली ‘एआय’ची कास; लवकरच स्थानिक पातळीवर कार्यवाही

यात कोल्हापूरच्या नितीन माटुंगेने तर सचिन तेंडुलकरने पुढाकार घेतलेल्या इंडियन स्ट्रीट लीगमध्ये सर्वाधिक सहा लाखांची बोली एका संघासाठी स्वीकारली होती. यात ‘सामनावीर’साठी अडीच लाखांचे बक्षीसही मिळवले. त्याच्यासह मुंबईचा केतन म्हात्रे हा तर प्रतिसामना एक लाखाचे मानधन घेतो. त्याने तर सामनावीर, मालिकावीर म्हणून सहा मोटारकार, ७५ मोटारसायकल अशी बक्षिसे पटकावली आहेत.

कोलकात्याचा जगत सरकारही महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये स्थानिक संघांतून व्यावसायिक खेळाडू म्हणून प्रतिसामना एक लाखाच्या मानधनात खेळत आहे. त्याच्या खात्यात एक लाख रुपये डिपॉझिट करावे लागतात. त्यानंतर तो मार्गस्थ होऊन संबंधित संघातून खेळतो आणि ती स्पर्धाही संबंधित संघ जिंकतो.

अशाच पद्धतीने मूळचा कुर्डूवाडीचा, पण सध्या पुण्यात स्थायिक झालेला कृष्णा सातपुते हा तर एक दिवसासाठी २५ हजार, दोन दिवसांसाठी ४० हजार आणि तीन दिवसांच्या पॅकेजसाठी ५० हजार असे मानधन घेतो. त्याची समाजमाध्यमांत जोरदार चर्चा आहे.

त्यानेही कोल्हापूरच्या शास्त्रीनगर, कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदानावर आणि सांगली, कोल्हापुरातील ग्रामीण भागात आपला खेळ दाखविला आहे. बिहारचा करण अंबाला हासुद्धा पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात प्रसिद्धीस आला आहे. त्याचेही मानधन लाखात आहे. याशिवाय योगेश पेणकर, इजाज कुरेशी, कृष्णा पवार ही मंडळीही टेनिस बॉल क्रिकेट जगतात बाप माणसे म्हणून गणली जातात.

स्थानिक रोजगाराला बळ

या स्पर्धांमध्ये मैदान भाडे दिवसाला एक ते पाच हजार रुपये घेतले जाते. याशिवाय विद्युत व्यवस्था, जनरेटर, ध्वनी यंत्रणा, जर्सी प्रिंटिंग, डिजिटल फलक, बॅनर, सामन्याचे धावते समालोचन, काही ॲपवरून थेट लाइव्ह प्रक्षेपण, प्रतिसामना पंच व स्कोरर मानधन ३५०० रुपये घेतले जाते. यात स्थानिकांना रोजगार मिळत आहे.

समाजमाध्यमांमुळे तत्काळ प्रसिद्धी

समाजमाध्यमांमुळे थेट प्रक्षेपणामुळे प्रेक्षक संख्या हजारोत पोहोचते. स्थानिक उद्योग, व्यावसायिकांकडून २५ ते २ लाखांपर्यंत प्रायोजकत्व मिळते. जाहिराती , ऑनलाईन व्ह्यूजमधून अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत तयार झाले आहेत. नामांकित ऑयकॉन खेळाडूला प्रतिसामना तीन ते १० हजार रुपये दिले जातात. काही आघाडीचे खेळाडू दोन ते तीन लाखांपर्यंतची एकाच स्पर्धेतून कमाई करतात.

या स्पर्धा गाजवतात हे कोल्हापूरकर

नितीन माटुंगेला सर्वाधिक मागणी असून, अन्य खेळाडूंमध्ये संदीप मकवाना, मनोज संकपाळ, अवधूत पाटील, जलसिंग पाटील, प्रमोद पाटील, रोहित खांडेकर, मुकेश शिंदे यांनाही मागणी आहे. सर्वात प्रभावी युवा खेळाडू म्हणून प्रतीक पाटीललाही विविध संघांकडून मागणी आहे.

चर्चेतील बक्षिसे आणि कोटींची उलाढाल

तालुका-जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकास एक ते पाच लाखांपर्यंतची बक्षिसे दिली जातात, तर स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पाच ते १५ हजार इतके दमदार असते. मध्यम स्वरूपाची स्पर्धा असेल तर आर्थिक उलाढाल १० ते १५ लाखांपर्यंतची होते. वर्षातील ३६५ पैकी १७५ दिवस हा हंगाम असतो. यात चारचाकी, मोटारसायकल, सायकल, फ्रीज, वॉशिंग मशीन ते गृहोपयोगी प्रापंचिक साहित्यासह रोख रक्कम अशी बक्षिसे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे हंगामात शेकडो स्पर्धा आणि कोट्यवधींची उलाढाल होते.

टेनिस बॉल क्रिकेट विश्व संघटित नाही. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची निर्मिती कोल्हापुरात व्हायला हवी. १६ संघांची नोंदणी व्हायला हवी. खेळाडूंना वर्षभर एका संघाकडून खेळणे बंधनकारक केले पाहिजे. संयोजकांनीही भरमसाट शुल्क घेऊन चार ते पाच षटकांचे सामने न घेता १० षटकांचे सामने खेळवावेत. हा खेळ केवळ विरंगुळा न राहता पश्चिम महाराष्ट्रात सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा आधार बनला आहे. संघटित पाठबळ मिळाल्यास या स्पर्धांमधून ग्रामीण-शहरी भागात रोजगार, आर्थिक स्थैर्याची नवी दारे उघडू शकतात.

- किरण खतकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.