Dr. Janardan Waghmare : लातूर पॅटर्नचे शिल्पकार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपले
esakal March 03, 2026 12:45 PM

माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

लातूर : विद्वत्ता, नम्रता, तत्वनिष्ठता याचा संगम असलेले, साहित्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले ख्यातनाम साहित्यिक-विचारवंत, माजी कुलगुरू, माजी खासदार प्रा.डॉ. जनार्दन वाघमारे (वय ९२) यांचे सोमवारी (ता. दोन) सकाळी साडेआठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. तीन) कौठा (ता. औसा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाची वार्ता समजताच त्यांच्या ‘आविष्कार’ या निवासस्थानी विविध क्षेत्रांतील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांच्या जाण्याने ‘समाजचिंतक हरपला’ अशा शब्दांत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

गेल्या काही महिन्यांत सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा या घनिष्ट मित्रांच्या अचानक जाण्याने डॉ. वाघमारे हे खचले होते. त्यातच मागील महिन्यात ते घरात पाय घसरून पडले. त्यांच्या डोक्याला मार बसला. त्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयातून नुकतेच त्यांना घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र, आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

Vasantrao Naik: वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेची वास्तू जीर्ण

डॉ. वाघमारे यांचा जन्म कौठा येथे ११ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला. उस्मानिया विद्यापीठ (बीए), पुणे विद्यापीठ (एमए), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (पीएचडी, एलएलबी, एलएलएम), पंजाबी विद्यापीठात (पतियाळा) त्यांनी डी.लिट केले. प्राध्यापक झाल्यानंतर डॉ. वाघमारे लेखनाकडे वळले होते. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. वैचारिक लेखनाबरोबरच कादंबरी, प्रवास वर्णन, आत्मचरित्रात्मक कादंबरी, व्यक्तिचित्रण, ललित, अनुवाद असे विविध साहित्यप्रकार प्रभावीपणे हाताळले. विविध भाषांतील त्यांची ७६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

राजकीय पटलावरही चमक

निवृत्तीनंतर डॉ. वाघमारे यांनी लातूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अनेक विकासकामे केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांची राज्यसभेसाठी निवड झाली होती. मराठवाड्याच्या विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी राज्यसभेत वाचा फोडली. सामाजिक कार्यासह विविध चळवळींमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. कुष्ठरोगी, अंध, दिव्यांगांचे पुनर्वसन, जाती निर्मूलन, प्रौढ शिक्षण, हमाल पंचायतीची स्थापना अशा कार्यांत ते सहभागी झाले होते. जातीपातींना मूठमाती देणाऱ्या ‘राष्ट्रीय सेवाग्राम’ या अभिनव गावाची राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत त्यांनी केलेली निर्मिती, हा आगळा प्रयोग ठरला. विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम केले. वयाची नव्वदी ओलांडली असली तरी त्यांची बुद्धिमत्ता अतिशय तल्लख होती. कधी श्रोता तर कधी वक्ता म्हणून विविध समारंभांना ते उपस्थित राहत असत. त्यांचे लेखनकार्यही अखेरपर्यंत सुरू होते.

Dr. Janardan Waghmare : साहित्य आणि शिक्षण क्षेत्राचा महामेरू हरपला! माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे 91 व्या वर्षी निधन; 'असा' होता त्यांचा जीवनप्रवास! विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान

डॉ. वाघमारे यांचा मूळ पिंड शिक्षणतज्ज्ञाचा होता. त्यांनी अध्ययन, अध्यापन हा आपला जीवनधर्म मानला होता. प्राध्यापक, प्राचार्य आणि त्यानंतर कुलगुरू म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम पाहिले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. ‘लातूर पॅटर्न’ या शैलीचे ते शिल्पकार होते. वाघमारे हे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक प्राप्त केला होता.

प्रा.डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला. इंग्रजी भाषा, साहित्यासह अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अध्यापन- प्रशासन या अंगाने शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला. त्यांची ग्रंथसंपदा सर्वांसाठी एक प्रकारचे संचित आहे. त्यांनी लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्षपदही भूषविले.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

डॉ. वाघमारे यांची लातूरनगरीचे पहिले ‘लोकनियुक्त नगराध्यक्ष’ म्हणून कारकीर्द उल्लेखनीय राहिली. त्यांची संसदीय कारकीर्दही कौतुकास्पद होती. पुरोगामी विचारांवर त्यांची पकड होती. शिक्षण, कृषी, साहित्य, कला, राजकारण व समाजकारण आदी क्षेत्रांत त्यांचा मुक्त संचार होता. राठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च स्थान मिळवून देणारे लातूर पॅटर्न शैलीचे ते शिल्पकार होते.

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.