Nashik Crime : सातपूर हादरले! विवाहितेची दोन लाखांत विक्री करून लावला बळजबरीने विवाह
esakal March 03, 2026 01:45 PM

नाशिक: सातपूर परिसरातील १९ वर्षीय विवाहितेला इव्हेंटच्या कामाला जायचे असल्याचे सांगत मालेगावमार्गे जातेगावला नेत तिची दोन लाखांत विक्री करत बळजबरीने विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विवाहितेच्या सुटकेसाठी पोहोचलेल्या सातपूर पोलिसांच्या पथकाला जातेगावात जमावाने घेराव घालत विरोध केला. अतिरिक्त पोलिस कुमक आल्यानंतर विवाहितेची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी संशयित दोन महिलांविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूरच्या कार्बन नाका परिसरात १९ वर्षीय विवाहिता तिच्या आईकडे राहते. शुक्रवारी (ता. २७) विवाहिता काहीही कारण न सांगता घरातून निघून गेली होती. तर शनिवारी (ता. २८) सकाळी तिने आईशी संपर्क साधत, राणी आणि भागी नावाच्या दोन महिलांनी तिची दोन लाखांत विक्री करीत जातेगावातील (ता. नांदगाव) युवकाशी बळजबरीने विवाह लावण्यात आल्याचे सांगितले.

पीडिततेच्या आईने सातपूर पोलिस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे अंमलदार दीपक खरपडे व महिला अंमलदार वंदना पवार यांनी जातेगाव गाठले. पीडिता जातेगावातील युवक नवनाथ खिराडकर याच्या घरात आढळून आली. पथकाने पीडितेला ताब्यात घेतले असता, दोनशे ते तीनशे स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घालत पीडितेला घेऊन जाण्यास विरोध केला. ‘दोन लाख देऊन मुलीसोबत विवाह लावला आहे. ‘त्या’ महिलांना समोर आणा, दोन लाख द्या, त्यानंतर मुलीला घेऊन जा,’ असा पवित्रा जमावाने घेतला.

अतिरिक्त कुमक हजर

हवालदार खरपडे यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे यांनी नांदगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भदाणे यांना माहिती दिली. त्यानुसार भदाणे व त्यांच्या पथकाने जातेगाव गाठले आणि विवाहितेला ताब्यात घेत सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

...यांनी बजावली कामगिरी

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातूपरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे, उपनिरीक्षक राकेश न्याहदे, हवालदार दीपक खरपडे, वंदना पवार यांनी कामगिरी बजावली आहे.

Hupari Sabha : लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा; आमदार टी. राजासिंह : हुपरीत हिंदू राष्ट्र जागृती सभा

विवाहितेची आपबिती

सातपूर पोलिसांनी विवाहितेला ताब्यात घेत सातपूर गाठले. याबाबत तिच्याकडे चौकशी केली असता, तिने आपबिती सांगितली. संशयित राणी व भागी या दोघींनी तिला इव्हेंटच्या कामाला जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघींसोबत मालेगाव व त्यांनतर नांदगाव तालुक्यातील जातेगाव गेले. त्याठिकाणी दोघींनी तिची दोन लाखांत विक्री केली आणि तिचा नवनाथ खिराडकर याच्यासोबत बळजबरीने विवाह लावून दिला. मात्र, तिने संधी साधत आईला माहिती दिली. या प्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॅकेटची शक्यता

या घटनेमुळे शहरात मुलीची परस्पर विक्री करीत विवाह लावून देणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. पोलिस संशयित राणी व भागी यांचा कसून शोध घेत आहे. या टोळीने यापूर्वीही असे प्रकार केले असण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.