- रविंद्र गायकवाड
बिडकीन - मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इस्राईल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधनदर वाढीची चर्चा रंगू लागली असून, त्याचे पडसाद पैठण तालुक्यातील बिडकीन शहरात उमटले आहेत. 'युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवांनी शहरात वेग घेतल्याने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
'इंधनाचा साठा करून ठेवण्यासाठी' अनेकांनी दुचाकी, चारचाकी तसेच डब्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्या. निलजगाव रोडवरील तसेच शहरातील इतर पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. काही पंपांवरील साठा तात्पुरता संपल्याने ते ‘ड्राय’ झाल्याची माहितीही समोर आली.
वाहनधारकांशी संपर्क साधला असता, 'पेट्रोल पंप बंद होणार असल्याची चर्चा ऐकून येथे आलो. पुढील काही दिवस इंधन मिळणार नाही, अशी भीती वाटते,' असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पेट्रोल पंप असोसिएशन तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी 'सद्यस्थितीत इंधनटंचाईची कोणतीही अधिकृत माहिती नाही' असे स्पष्ट केले आहे. नियमित पुरवठा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. तरीही अफवांमुळे वाढलेली गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा कच्च्या तेलाच्या दरांवर परिणाम होऊ शकतो; मात्र तात्काळ पुरवठा खंडित होईल, असे चित्र नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.