Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ
esakal March 04, 2026 02:45 AM

पुणे - भांडार विभागाने दोन कोटी रुपयांचे साहित्य घेऊन ते अनेक वर्ष धूळ खात पडून होते. यात महापालिकेचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्या प्रकरणी २० अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, मुदत उलटून गेली तरी ८ जणांनी खुलासा देण्यास टाळाटाळ केली आहे.

महापालिकेने चतुर्थ श्रेणी कामगारांसाठी साडी, ड्रेस, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मागणीनुसार कचऱ्याची दुर्गंधी टाळण्यासाठी पावडर खरेदी केली होती. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले. ठेकेदारांना बिल देण्यात आले. पण या वस्तूंचा वापर न झाल्याने साहित्य आणि पैसे दोन्ही वाया गेले.

हा प्रकार मनसेचे सरचिणीस हेमंत संभूस यांनी उघडकीस आणून आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्यामध्ये भांडार विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग या विभागातील उपायुक्त, अभियंता, मुख्य अभियंता या दर्जाचे अधिकारी आहेत.

यासंदर्भात चौकशी समितीने २० जणांना प्राथमिकदृष्ट्या जबाबदार धरून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यातील १२ जणांनी उत्तर दिले आहे. तर नोटीस मिळूनही आठ जणांनी उत्तर न दिलेले नाही.

यासंदर्भात संभूस म्हणाले, अधिकाऱ्यांनी केलेले खुलासे त्रोटक व असमाधानकारक आहेत. महापालिकेचे झालेले नुकसान या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करा अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.