भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला
esakal March 05, 2026 12:45 AM

महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून अद्याप महाराष्ट्रातील उमेदवार कोण हे जाहीर करण्यात आलं नाहीय. दरम्यान, भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर महिला उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे. यात विदर्भातील मायाताई इवनाते यांचं नाव आघाडीवर आहे. नागपुरातून मायाताई इवनाते यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असून त्या आदिवासी महिला नेत्या असून माजी महापौरही होत्या.

आदिवासी महिला या नात्याने नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते यांचे नाव पुढे असल्याची माहिती. अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय आयोगाच्या माजी सदस्या (नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्स) राहिल्या असून अलीकडेच नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यांना NCST सदस्य या नात्याने दिल्लीत राज्यमंत्री पदाचा दर्जा होता.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून मायाताई इवनाते यांना ओळखलं जातं. राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा आणि हालचाली सध्या सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर मायाताई यांना मंगळवारी मुंबईला बोलावून घेण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या नावाच्या चर्चा रंगल्या आहेत.

महाराष्ट्रातून महिला उमेदवार राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत. त्यातही आदिवासी समाजातील महिला उमेदवार राज्यसभेसाठी देण्याचा निर्णय राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

मायाताई इवनाते यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज दुपारी होण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार असून अर्ज माघारीचा शेवटचा दिवस ७ मार्च रोजी आहे. भाजपने मंगळवारी बिहार, आसाम, हरियाणातील एकूण ९ उमेदवारांची यादी जाहीर केलीय. त्यानंतर महाराष्ट्रातून कुणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.