हिंगोली - वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी बुधवारचा दिवस आनंदाचा ठरला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला अखेर मंजुरी मिळाली.
केवळ निवडणुकात अश्वासन देत मतदारांची दिशाभुल करणाऱ्या जयप्रकाश मुंदडा आणि जयप्रकाश दांडेगावकर यांना जे जमले नाही ते आमदार राजु नवघरे यांनी करुन दाखवले. यामुळे 40 गावातील 4 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
हिंगोली जिल्हा हा राज्यपाल सिंचन अनुशेषात मोडतो. हा अनुशेष दूर करण्यासाठी व वसमत विधानसभा मतदारसंघातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आमदार राजु नवघरे यांनी सतत पाठपुरावा करत होते. सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना पूर्ण झाली तर 40 गावातील 4 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
त्यासोबतच 30 गावच्या पिण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. त्यासाठी आमदार राजु नवघरे हे सातत्याने दिवंगत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करत होते.त्यासाठी अनेक बैठका मंत्रालयात पार पडल्या होत्या.
हिंगोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढले पाहीजे यासाठी स्वत: अजितदादा देखील अग्रही होते. त्यासाठी त्यांनी सिध्देश्वर उपसा जलसिंचन योजनेला गती दिली होती. अखेरच्या टप्यात असताना अजितदादांचे निधन झाले अन हा प्रस्ताव मागे पडला. परंतु राजु नवघरे यांनी हार मानली नाही.
त्यांनी अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरु केला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित बैठक झाली. अखेर बुधवारी याबाबत आदेश निघाला. या योजनेला मंजुरी मिळाली.त्यामुळे मतदार संघातील शेतकरी आनंदले.
आता या सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली असुन त्यामाध्यमातुन सर्वेक्षण, अन्वेषणला पण मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून वसमत विधानसभा मतदारसंघातील पांगरा शिंदे सर्कल, अंबा सर्कल, शिरडशहापूर सर्कल, पुरजळ सर्कल या सर्कलमधील गावे सिंचनाखाली येणार असून 4 हजार हेक्टर सिंचन क्षेत्र आता पाण्याखाली येणार आहे.
आमदार राजु नवघरे झाले भावनिक
उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळताच आमदार नवघरे भावनिक झाले. त्यांनी सकाळशी संवाद साधला, ते म्हणाले, ज्यांनी मला दोनदा आमदार केले. वसमत मतदार संघातील कोणत्याही कामाला तात्काळ मंजुरी दिली.
विशेष सिंचनाच्या कामासाठी दादा आग्रही असायचे, त्यांनीच सिद्धेश्वर उपसा योजनेला गती दिली. आज दादा असते तर त्यांनी मला सगळ्यासमोर राजु तुझ काम झालं. ही योजना केवळ तुझ्यामुळेच मार्गी लागली, एवढा पाठपुरावा कोणी केला नसता अशा शब्दात त्यांनी कौतुक केले असतं असे म्हणत राजु नवघरे भावनिक झाले.
वसमत तालुक्यातील 25 च्या वर आणि औंढा तालुक्यातील 15 गावांमधील मोठे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील सिंचन क्षमतेत मोठी वाढ होणार असून, शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल. या योजनेला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यामुळेच मिळाली पण दादा आज हे पहायला नाहीत यांची खुप मोठी खंत आहे. या अगोदरपण अजित दादांनी पुर्णा नदीवरील अनखळी पोटा, पिंपळगाव कुटे, परळी दथरथे या मोठ्या बंधाऱ्यांना मराठवाड्याच्या संभाजीनगर येथील कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली त्याचे काम प्रगतीपथावर आहेत.अजितदादांचे उपकार हिंगोली जिल्हा कधीही विसरणार नाही.
- राजु नवघरे, आमदार वसमत