पुणे - शिरूर तालुक्यात खासगी दवाखान्यात सोनोग्राफी मशीनला चायनीज बनावटीचे मोबाईल ॲप जोडून त्याच्या मदतीने गर्भलिंग निदान केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शिरूर मधील ढोकसांगवीतील पाचंगे वस्ती येथील ‘लाइफ केअर क्लिनिक’ मध्ये ही बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने बुधवारी कारवाई करत आरोपी विरोधात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
हा दवाखाना बी.ए.एम.एस. डॉ. आकाश मालगुंडे यांचा असून तेथे गर्भवती महिलांमध्ये मुलगी आहे का मुलगा याची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभाग व गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्तपणे कारवाई केली.
त्यानुसार वाघोली पोलीस स्टेशनच्या पोलीस शिपाई प्रतीक्षा पानसरे यांनी रुग्णासोबत जाऊन प्रत्यक्ष सापळा रचला. दलाल नरेंद्र ठाकरे रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे याच्या मार्फत मोबाईल ॲपच्या साहाय्याने विविध रुग्णांची गर्भलिंग निदान तपासणी केल्याचे संयुक्त तपासात उघड झाले. म्हणून हा ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे छोट्या व एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवता येणाऱ्या सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भवतींची तपासणी करत असत. ते मशीन मोबाइलला जोडले जाऊन ॲपद्वारे ते गर्भलिंगनिदान करत असल्याचे आढळून आले.
कारवाई दरम्यान रुग्णालयात गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचा साठा आढळून आला असून संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक ७ चे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय शिरूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
गर्भलिंग निदान करणे व करवून घेणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांची माहिती तात्काळ आरोग्य विभाग किंवा पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन डॉ. यमपल्ले यांनी केले आहे.