वसईत रंगले कोकणचे खेळ
रंगपंचमीनिमित्त गोमू, शंकासुराचे दर्शन
नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : विरार येथील गुरुकृपा सोसायटीतील गुहागरमधील रहिवाशांनी रंगपंचमीच्या दिवशी कोकणची पारंपरिक लोककला मोठ्या उत्साहात सादर करत कोकणचे खेळ सादर केले. या वेळी गोमू, शंकासुराच्या दर्शनाने शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला.
पारंपरिक वेशभूषा, ढोलकीच्या ठेक्यावर रंगणारे नृत्य, गाणी, धार्मिक विधींनी वातावरण भारावून गेले होते. गोमू आणि शंकासुर ही प्रमुख आकर्षणे ठरली. यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ढोलकी, टाळ, डफ, तुणतुणा, झांज यांच्या गजरात कलाकारांनी ताल धरत सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी देवाला गाऱ्हाणे घालून मंगलमय समारोप करण्यात आला. या वेळी कोकणात १५ ते २० दिवस चालणारी परंपरा विरारमध्ये एका दिवसात अनुभवायला मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठांचा सहभाग दिसून आला. नव्या पिढीला मातीतल्या परंपरांची ओळख व्हावी, लोककलेबद्दल अभिमान निर्माण व्हावा, सांस्कृतिक एकात्मता वाढावी, हा उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.