T20 World Cup Final March 8 India : ध्वज विजयाचा उंच धरा रे!
esakal March 08, 2026 08:45 AM

शैलेश नागवेकर- shailesh.nagvekar@esakal.com

विशिष्ट खेळपट्टीचा आग्रह नसावा

२०२३ मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अहमदाबादमध्ये भारताचे दोन सामने झाले, त्यातील पाकिस्तानला सहज पराभूत केले तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार झाली. अहमदाबादमधील काही खेळपट्ट्या काळ्या मातीच्या आहेत. वानखेडेवरील सर्व खेळपट्ट्या लाल मातीच्या आहेत. त्यात आपला संघ हमखास यश मिळवतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यातील काळ्या मातीच्या खेळपट्टीची तयारी भारतीय संघ व्यवस्थापनाकडून काही बदलासाठी आग्रह धरण्यात आला होता, असे सांगण्यात येत होते. त्यानंतर प्रत्यक्ष सामन्यात काय घडले ते सर्वांनाच माहीत आहे. आता या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा आफ्रिकेविरुद्धचा सामना अहमदाबादमध्ये झाला आणि त्यात आफ्रिकेविरुद्ध एकतर्फी हार झाली. आजच्या सामन्यासाठीही काळ्या मातीचीच खेळपट्टी असेल; पण त्यात बदल करण्याचा आग्रह धरला जाऊ नये. खेळपट्टीपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. शेवटी प्रामाणिकपणाने केलेल्या

भक्तीनेच विठ्ठल भेटतो.

सर्वाधिक पसंती असली तरी सुरुवातीच्या सामन्यांत परिपूर्ण कामगिरी झाली नाही. अडखळत असले तरी निर्धाराने एकेक पाऊल ठोसपणे टाकत भारतीय संघाची दिंडी आता विश्वकरंडक स्पर्धेच्या मंदिरात विठ्ठलाच्या भेटीसाठी पायऱ्यांवर आलीय. तीन वर्षांपूर्वी अगदी मंदिरात प्रवेश करूनही विठ्ठलाने दर्शन दिले नव्हते. या वेळी असे होऊ नये म्हणून सर्वच जण देवाला साकडे घालत आहेत. ‘बा महाराजा... दर्शन दे रे विठूराया!’ असे म्हणत भारतीय क्रिकेटचे सर्वच वारकरी अर्थात कोट्यवधी चाहते हीच प्रार्थना करत आहेत. आजचा ८ मार्चचा दिवसही भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावो, हीच अपेक्षा आहे.

देशभरात सर्वत्र चर्चा आणि उत्सुकता असलेली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर गतविजेता कर्णधार रोहित शर्माच्या एका जाहिरातीने लक्ष वेधले होते. ‘हिस्ट्री डिफिट करेंगे... हिस्ट्री रिपीट करेंगे’. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही संघाला सलग दुसऱ्यांदा आणि मायदेशात हा करंडक जिंकता आलेला नाही... हा इतिहास मोडायचा आहे. तर गतवर्षी जिंकलेला हा करंडक पुन्हा आपल्याकडेच ठेवायचाय... हा इतिहास यंदाही साजरा करायचाय. अशा जाहिराती असो वा कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षा, त्या भावनिक असतात, प्रत्यक्षात मात्र जो ‘जिता वही सिकंदर’ असतो. सूर्यकुमारच्या संघाला आता अजेय कामगिरी करायचीय. अपेक्षा तर काठोकाठ भरलेल्या आहेत. क्षमताही उच्च कोटीची आहे, केवळ सर्व काही जुळून येण्याची गरज आहे.

२०२३मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गटसाखळीत एकहाती कामगिरी करत शानदार विजय मिळवले. हा भारतीय संघ विजेता होणार ही केवळ औपचारिकता असे चित्र होते; पण येथून पुढे म्हणजे उपांत्य आणि अंतिम सामन्यात संघाला थोडी नशिबाची साथ मिळणे महत्त्वाचे असेल, असे चाणाक्ष असलेले आणि स्वतः तरबेज प्रशिक्षकही असलेले रवी शास्त्री म्हणाले होते. आठवतोय ना, अहमदाबादमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो अंतिम सामना? फॉर्मात असलेल्या रोहित शर्माचा ट्रॅव्हिस हेडने मागे जात पकडलेला अफलातून झेल आणि हाच ट्रॅव्हिस हेड शतकी खेळी साकार करत असताना भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत होता. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी भेदक मारा करत होते. चेंडू हेडच्या बॅटच्या काही मिलिमीटर अंतरावरून जात होते; पण बॅटला लागत नव्हते. तो दिवस भारतीय संघाचाच नव्हता. सर्व काही विरोधात घडत होते अगदी नाफेफेकीपासून. आजचा ८ मार्चचा रविवार भारतीय संघाचा असावा. तीन दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात सर्वोत्तम ठरलेला आणि भारतीय संघाचा तारणहार संजू सॅमसनचा सोपा झेल इंग्लंड कर्णधार हॅरी ब्रुकने सोडला, त्या वेळी तो १५ धावांवर होता आणि त्यानंतर सॅमसनने ८९ धावांची निर्णायक खेळी केली. हा झेल ब्रुकने पडकला असता तर काय घडले असते, हे सांगणे कठीण आहे. सांगायचा मुद्दा असा, अशा निर्णायक सामन्यांत एखादा पडलेला झेल किंवा सोडलेला झेल विजय-पराभवाचे अंतर स्पष्ट करत असतो. गेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजेतेपदाचे अनेक क्षण रंगले; परंतु लक्षात ठेवला जातोय तो सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर आत बाहेर जात पकडलेला डेव्हिड मिलरचा झेल. हाच सूर्यकुमार आता भारतीय संघाचा इतिहास पुन्हा घडवण्यास सेनापतीच्या जबाबदारीने तयार झालाय. अहमदाबादच्या स्टेडियमवर रोहित शर्माचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सूर्यकुमार पूर्ण करणार का, याची उत्सुकता कमालीची ताणली गेलीय.

Premium|Rohit Sharma And Virat Kohli: पर्यायी ‘उत्तर’ नाही! रोहित-विराटशिवाय भारतीय क्रिकेट पोरकं

भारत अंतिम सामन्यात पोहोचला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही निर्णायक लढत होईल, अशी अटकळ होती; पण कोणी अपेक्षाही केली नव्हती त्या न्यूझीलंड संघाने बलाढ्य आफ्रिकेला अक्षरश: पाणी पाजले. त्यामुळे बाद फेरीच्या सामन्यात ‘सब घोडे बारा टक्के’ असतात.विश्वकरंडक स्पर्धेच्या मोहिमेतील अखेरच्या तयारीत भारत-न्यूझीलंड यांचात पाच सामन्यांची मालिका झाली, त्यात भारताने ४-१ असा दणदणीत मालिका विजय मिळवला होता. ३१ जानेवारी रोजी ती मालिका संपली होती आणि ७ फेब्रुवारीपासून विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाली होती. या संदर्भाचा विचार करायचा तर आजच्या अंतिम सामन्यात भारताचे अगदी निर्विवाद वर्चस्व अपेक्षित आहे; पण तसे चित्र आजच्या सामन्यासाठी आहे का? तर निश्चितच नाही. कारण आफ्रिकेला हरवताना अलेन फिन आणि टीम सैफर्ट यांनी आफ्रिकेच्या भरभक्कम गोलंदाजीची केलेली कत्तल धडकी भरवणारी आहे. मुळात टी-२० हा प्रकारच बेभरवशाचा आहे. एखादा चेंडू, एखादा झेल, एखादा धावचीत सामन्याचा निकाल बदलतो. त्यामुळे ‘नजर हटी दुर्घटना घटी’ ही उक्ती या प्रकारासाठी चपखल लागू आहे.

विश्वकरंडकाच्या या मोहिमेत आपले दोन खेळाडू अत्यंत महत्त्वाचे होते. एक होता अभिषेक शर्मा आणि दुसरा वरुण चक्रवर्ती; परंतु हे दोघेही असून नसल्यासारखेच आहेत. आता पुरे झाले अभिषेकला वगळा, असे म्हणायची वेळ आलीय. पहिल्या दोन षटकांत तो बाद होणार ही काळ्या दगडावरची रेघच झालीय जणू काही. वरुण चक्रवर्ती एकाद दोन विकेट मिळवेल; परंतु त्यासाठी तो ज्या धावा देतो त्यासाठी फलंदाजीत धावांची बँक तयार करावी लागते. थोडक्यात उदाहरण द्यायचे तर उपांत्य सामन्यात वरुण चक्रवर्तीने चार षटकांत २४ चेंडूंत ६४ धावा दिल्या. त्याअगोदर भारतीय संघाने उभारल्या होत्या. २५३ धावा म्हणजेच वरुणने दिलेल्या धावा वजा केल्या तर इंग्लंडसाठी १६ षटकांत १९० धावांचेच आव्हान होते.

कोणताही संघ असला तरी एक साधी सोपी रणनीती असते, प्रतिस्पर्धी संघातील कमजोर खेळाडूंवर अधिक वार करायची. त्यामार्गे संघावर दबाव टाकायचा. अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती या दोघांना अजच्या सामन्यात टार्गेट केले जाणार हे निश्चित. यातून मार्ग कसा काढणार? गुरुवारी उपांत्य सामना झाला, शुक्रवार प्रवासात गेला. शिल्लक राहिला तो सरावासाठी शनिवारचा एकच दिवस. अभिषेक आणि वरुण यांची उदाहरणे द्यायचे कारण एवढेच की विजेतेपदाच्या सामन्यात एकेक नाणे खणखणीत वाजणे महत्त्वाचे असते. अभिषेकऐवजी रिंकू सिंग हा बदल होऊ शकतो; पण वरुणऐवजी संधी द्यायची तर कुलदीप यादवला पुरेशी मॅच प्रॅक्टिस नाही. त्यामुळे हा बदल होईल असे वाटत नाही, त्यामुळे वरुणला आत्मविश्वास देणे हाच पर्याय शिल्लक राहतो.

नकोसा सॅमसन आता हवाहवासा

या विश्वकरंडक स्पर्धेची मोहीम सुरू होत असताना मायदेशात भारतीय संघ आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी पाच-पाच सामने खेळला. त्यात अभिषेक हुकमी एक्का होताच; पण सलामीला ईशान किशनचा समावेश झाल्यावर आणि संधी मिळूनही अपयशी ठरलेला सॅमसन नकोसा झाला होता. सॅमसन विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम ११ खेळाडूंत खेळेल, असे कोणालाच वाटत नव्हते; परंतु अभिषेक-ईशान या अपयशी ठरणाऱ्या सलामीच्या जोडीत बदल करण्यासाठी सॅमसनला संधी देण्यात आली आणि नकोसा असलेला सॅमसन हवाहवासा आणि प्रमुख फलंदाज झाला. वेस्ट इंडीजविरुद्धची त्याची एक खेळी केवळ त्याच्या स्वतःसाठीच नव्हे तर पूर्ण संघाचा आत्मविश्वास उंचावणारी ठरलीय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.