बादशाहच्या ‘टिटिरी’ गाण्यावरून वाद; FIR नंतर सिंगरची माफी, गाणंही हटवलं, नेमकं प्रकरण काय?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 08, 2026 10:13 AM

Badshah Song Controversy: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशहा याच्या नव्या हरियाणवी गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘टिटिरी’ (Titiri) या गाण्यामुळे हरियाणा सरकारने कठोर भूमिका घेतली असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बादशहाविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. या गाण्यात हरियाणा रोडवेज बस आणि शाळेचा गणवेश घातलेल्या मुली दाखवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गाण्याच्या शूटिंगमध्ये वापरलेल्या सरकारी साधनसामग्रीची चौकशी सुरू केली आहे. यानंतर . त्याने व्हिडिओ हटवला असून एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.

नेमका कशाने झाला वाद?

गाण्यात शाळेचा गणवेश घातलेल्या मुली आणि हरियाणा रोडवेजची बस दाखवण्यात आल्यामुळे सरकारने आक्षेप घेतला आहे. गाण्याचे बोल आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत सरकारने म्हटलं आहे की अशा प्रकारे शालेय विद्यार्थिनींच्या वेशभूषेचा वापर करणे अत्यंत निंदनीय आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंग सायनी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. सरकारच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “गाण्याच्या नावाखाली हरियाणाच्या संस्कृतीची खिल्ली उडवली जात आहे.”

शाळा व्यवस्थापनावर कारवाईची शक्यता

या गाण्याच्या शूटिंगसाठी रोडवेज बस आणि शाळेचा परिसर कसा वापरला गेला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील सूचना देण्यात आल्या आहेत. गाण्यात दिसणारी रोडवेज बस कोणत्या डेपोची आहे याची ओळख पटवावी. तसेच संबंधित बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरवर विभागीय कारवाई करावी. गाण्यात दिसणाऱ्या शाळेची ओळख पटवून व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत.सरकारचे म्हणणे आहे की हरियाणातील मुलींच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही.

यूट्यूबवरून गाणे हटवले, बादशाहची माफी

यूट्यूबवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत या गाण्याला सुमारे 4.8 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. मात्र वाद वाढल्यानंतर गाणे प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले. FIR नोंद झाल्यानंतर बादशाहने स्वतःचा सेल्फी व्हिडिओ शेअर करून माफीही मागितली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “ नमस्कार, मी बादशाह. माझं नवीन गाणं 'टिटीरी' प्रदर्शित झाले आहे. मी पाहतोय, या गाण्याच्या शब्दांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या गाण्यात गेलेल्या काही दृश्यांमुळे माझ्या हरियाणाच्या लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. मी स्वतः हरियाणाचा आहे. माझी ओळख हरियाणामुळेच आहे. कोणत्याही मुली किंवा मुलाबद्दल अपमानास्पद बोलण्याचा माझा हेतू नव्हता. हिप-हॉप संस्कृतीत स्पर्धात्मक लिरिक्स असतात, पण त्याचा अर्थ कोणाचाही अपमान करणे असा नव्हता.” या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू असून कलाकारांनी संस्कृतीचा आदर राखत कलाकृती सादर कराव्यात, अशी प्रतिक्रिया सरकारकडून देण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.